मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि वाद हे एक आता समीकरणच बनल आहे. राज्यपाल भगतसिंग कोषारी हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्य असो की सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबत केलेलं वक्तव्य असो. राज्यपालांमुळे महाराष्ट्रात नेहमीच राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. आपल्या वादग्रस्त विधानामूळ चर्चेत असलेले राज्यपाल, आता एका अभिनेत्रीमुळे वादाच्या भोवऱ्यात (Model Maera Mishra photo shoot with Governors) सापडले आहेत. यावर आता महाराष्ट्र निर्माण सेना आक्रमक (MNS questions about Governors reputation) झाली असून; मनसेने याचा निषेध केला आहे.
राज्यपालांच्या प्रतिष्ठेशी खेळ : मुंबई येथील राजभवनात एका एनजीओच्या काही महिला राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. या महिलांबरोबर अभिनेत्री मायरा मिश्राही गेली होती. राज्यपालांच्या दालनात मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. तरीही अभिनेत्री मायरा मिश्राने फोटो काढले. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये एका फोटोत ती राज्यपालांच्या खुर्चीला रेलून उभी राहिलेली दिसते. अशा प्रकारे फोटो काढून राज्यपालांच्या प्रतिष्ठेशी खेळ केला असल्याचा आरोप मनसे नेते मनोज चव्हाण यांनी केला आहे. अशा पद्धतीने फोटो कसे काढू शकतात? असा सवालही मनोज चव्हाण यांनी केला आहे.
मनसेने राज्यपालांना खडे बोल : या मॉडेलचे राजभवनातले फोटो समोर आले असून; त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मायरा मिश्रा या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत तसंच राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत.
ट्वीटनंतर आता नवा वाद : मनसे नेते मनोज चव्हाण यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, 'ठिकाण राजभवन - ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?' या ट्वीटनंतर आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
मॉडेलनं हटवला फोटो : मॉडेल मायरा मिष्रा हिने राजभवनात काढलेले फोटो आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबर काढलेले फोटो आपल्या सोशल अकाउंट वर प्रसिद्ध केल्यानंतर अनेक चर्चांना पेव फुटले. विवादामुळे मॉडेल मायरा मिश्रा हिने राज्यपालांच्या रिकाम्या खुर्ची सोबत काढलेला विवादित फोटो सोशल मीडियावरून हटवला आहे. मात्र इतर फोटो अद्यापही तिच्या सोशल अकाउंट ठेवण्यात आले आहेत.
कोण आहे मायरा मिश्रा : मायरा मिश्रा ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. एका चैनलच्या रियालिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. तसेच तिने काही हिंदी मालिकांमध्ये देखील काम केला आहे. यासोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर अशा माध्यमातून ती सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असते.
राजभवनाच म्हणणं काय? : या संदर्भात आम्ही राजभवनातील एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी हे त्या ठिकाणाहून गेल्यानंतर या अभिनेत्रीने खोडसाळपणा केल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी, यानंतर अशा पद्धतीचा खोडसाळपणा कोणी करणार नाही यासाठी आम्ही काळजी घेऊ. असे देखील ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणटलं आहे.