मुंबई : हल्ल्यात जखमी झालेल्या संदीप देशपांडे यांना अधिक उपचारासाठी मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार केल्यानंतर देशपांडे यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर येतात संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी असल्या भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही. या हल्ल्यामागे कोण आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. ज्यांना वाटतेय या छोट्या हल्ल्याने मी घाबरेल त्यांनी काय ते समजून घ्यावे. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अशांना मी भीक घालत नाही, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
देशपांडे यांच्या हाताला, पायाला दुखापत : या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या हाताला आणि पायाला प्लास्टर करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी हा हल्ला स्टंप आणि रॉडच्या सहाय्याने केल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सध्या संदीप देशपांडे यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
राज ठाकरे सहकुटुंब देशपांडे यांच्या भेटीला : संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे या दोघांनी थेट हिंदुजा रुग्णालय गाठले. संदीप देशपांडे यांच्या तब्येतीची चौकशी केली. अशी माहिती मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे स्वतः गाडी चालवून रुग्णालयात दाखल झाले. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या.
प्रमुख नेते रुग्णालयात उपस्थित : सध्या हॉस्पिटल परिसरात संदीप देशपांडे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते नितीन सरदेसाई, संतोष धुरी व अन्य पदाधिकारी हिंदुजा रुग्णालयात उपस्थित आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकच आक्रमक झाली आहे. या हल्ल्यामागे नेमके कोण आहे? याचा अधिक तपास करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.