मुंबई - मालाडच्या पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना चुकीच्या पद्धतीने भिंत बांधल्याने झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीची आदेश दिले आहेत. त्यानंतर भिंतीचे बांधकाम करणाऱया कंत्राटदाराला पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित कंत्राटदारावर ‘एफआयआर’ का नोंदवू नये असा सवाल करून तातडीने स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. याबाबत चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून, येत्या १५ दिवसात समिती अहवाल सादर करणार आहे.
मुसळधार पावसात सोमवार - मंगळवारच्या मध्यरात्री मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून २६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १२१ जण जखमी झाले आहेत. जखमी १२१ पैकी ७२ जणांवर अजूनही उपचार सुरू असून २३ जणांना उपचार करून सोडण्यात आले आहे. जखमींवर कांदिवलीचे शताब्दी रुग्णालय, जोगेश्वरीचे ट्रामा केअर सेंटर, मालाडचे एम.व्ही. देसाई रुग्णालय, अंधेरीचे कूपर हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. जखमींमधील अत्यवस्थ असलेल्या चौघांचा बुधवारी मृत्यू झाला.
या दुर्घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तीन वर्षापूर्वी बांधण्यात आलेली ही भिंत निकृष्ट दर्जाची असून संबंधित कंत्राटदारावर एफआयआर दाखल का करू नये असा प्रश्न विचारण्यात आला आहे. मंगळवारी वरळी येथे अतिरिक्त आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत भिंतीचे बांधकाम करणाऱया कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटिस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्य जलअभियंता अशोक कुमार तवाडीया यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत मुंबई व्हिजेटीआय व आयआयटीच्या तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. ही समिती येत्या १५ दिवसात आपला अहवाल देणार आहे. यानंतर संबधित दुर्घटनेला जबाबदार असणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळेच भिंत कोसळली -
मालाड दुर्घटनेच्या प्राथमिक अहवालात भिंतीवर साठलेल्या पाण्याचा दाब आल्यामुळे ती कोसळल्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. शिवाय जमा झालेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवलेली छिद्रे बुजलेली असल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, याकडे संबधित कंत्राटदाराने लक्ष दिले नसल्यामुळे पाणी साठून भिंतीवर दाब वाढल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. सुमारे ३५ फुटी उंचीच्या भिंतीची रुंदी अतिशय कमी ठेवल्यामुळे भिंतीला दाब पेलता आला नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.