मुंबई - पेट्रोल व डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे, मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा या सार्वजनिक वाहतूक सेवाही भाडेवाढ होण्याचा मार्गावर आहे. टॅक्सी व रिक्षा भाडेवाढीसंदर्भात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत टॅक्सी भाडे तीन रुपये, तर रिक्षा भाडे दोन रुपयांनी वाढवण्यासंदर्भातील प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - मुंबई : वाहतूक पोलिसाच्या मदतीने हरवलेले सोने मिळाले परत
टॅक्सी-रिक्षा चालकांना फटका
मुंबई महानगरातील रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेवाढ गेल्या पाच वर्षांपासून झालेले नाही. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सतत इंधन दरवाढीमुळे मुंबईची टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले आहे. टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढसंदर्भात 22 डिसेंबर 2020 रोजी एमएमआरटीएची बैठक झाली होती. मात्र, या बैठकीत तांत्रिक कारणास्तव भाडेवाढीचा निर्णय झाला नाही. या उलट कोरोनामुळे प्रवासी संख्या घटलेली असताना इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे, टॅक्सी व रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
आंदोलनाचा इशारा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलेला होता. त्यामुळे, टॅक्सी आणि रिक्षा चालक, मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता सतत इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा व्यवसाय मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे, राज्य सरकारने मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या समस्यांना लक्षात घेत टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ करण्याची मागणी स्वाभिमान टॅक्सी रिक्षा चालक युनियनकडून करण्यात आली आहे. आमची मागणी सरकारने मान्य केली नाही तर, संघटनेकडून राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमान टॅक्सी रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष के.के तिवारी यांनी दिला आहे.
काय आहे भाडे
सध्या टॅक्सीचे किमान भाडे 22 रुपये असून त्यात 3 रुपयांची वाढ झाल्यास ते 25 रुपये होईल. तसेच, रिक्षाचे किमान भाडे 18 रुपये असून त्यात 2 रुपयांची वाढ होऊन 20 रुपये होण्याची शक्यता आहे. मुंबईत 48 हजार टॅक्सी असून त्यातील 25 हजारांहून कमी टॅक्सी प्रत्यक्षात रस्त्यावर धावत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात येत आहे. या उलट मुंबईत दोन लाखांहून अधिक रिक्षा असून महनगरातील रिक्षांची संख्या सव्वातीन लाखांच्या घरात आहे.
हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना मिळणार 'ऑन दि स्पॉट' न्याय; परिवहनमंत्र्यांची घोषणा