मुंबई Father Scolded Girl Ran Away : पंधरा वर्षीय मुलगी २१ ऑगस्टला मुंबईतील खेतवाडी क्रॉस लेन येथून गायब झाली होती. त्यानंतर टॅक्सी चालक असलेल्या त्या मुलीच्या वडिलांनी व्ही पी रोड पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आणि पोलिसांचे धाबे दणाणले. मुलीकडे मोबाईल नसल्यानं तिचा शोध घेणं देखील अवघड झालं होतं. अखेर पंधरा वर्षीय मुलगी सुखरूप तेलंगाणात आढळून आली. (Search Of Minor Girl) (Girl reaches Telangana as father gets angry) (Minor girl runs away from Mumbai)
यापूर्वी मुलगी तेलंगाणातच राहायची : तेलंगाणातील मेंचेरियल मंडल जिल्ह्यात असलेल्या हाजीपूर तालुक्यात राहणारी सानिया (नाव बदलेले) ही गावी आजोबा आणि काका, काकुंसोबत राहात होती. सानियाच्या आईचं निधन झाल्याने ती आजोबांसोबत राहत होती. मात्र ती मोबाईलवर जास्त बोलत असल्याची तक्रार तिच्या वडिलांकडे आजोबांनी केल्यानंतर तिला दोन महिन्यांपूर्वी मुंबईत आणण्यात आलं.
भाषेच्या अडचणीवर मात करून गाठलं तेलंगाणा : मुंबईतील खेतवाडी क्रॉस लेने येथे सानियाच्या वडिलांची मानलेली बहीण राहते. तिच्याकडे सानिया राहत होती. तर वडील क्रांतीनगर येथे राहत होते आणि उदरनिर्वाहासाठी टॅक्सी चालक म्हणून काम करतात. २१ ऑगस्टला सानियाचे वडील मानलेल्या बहिणीच्या घरी आले तेव्हा बहिणीच्या मोबाईल फोनवरून सानिया सतत मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती. त्यावेळी संतापून वडिलांनी सानियावर मोबाईलवर सतत बोलत असल्याने आरडाओरडा केला. वडील ओरडल्याने रागावलेली सानिया खेतवाडी येथील आत्याचे घर सोडून बाहेर पडली. त्यानंतर तिने चर्नी रोड रेल्वे स्थानक गाठले आणि दादर रेल्वे स्थानकात पोहोचली. सानियाला मराठी किंवा हिंदी भाषा येत नव्हती. तिला फक्त तेलुगु भाषा येत होती. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेनबाबत चौकशी करण्यात तिला अडचणी आल्या होत्या. मात्र २१ ऑगस्टला सायंकाळी साडेपाच वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सानियाने हैदराबादला जाणारी लांब पल्ल्याची ट्रेन पकडली आणि दुसऱ्या दिवशी २१ ऑगस्टला ती हैदराबादला पोहोचली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घेतला शोध : सानिया हैदराबादला पोहोचल्यानंतर तिच्या नलिनी (बदलेले नाव ) या मैत्रिणीला भेटली आणि त्यानंतर तिच्या मोबाईलवरून तिने वडिलांना फोन करून हैदराबादला असल्याची माहिती दिली. मात्र त्याआधीच सानियाच्या वडिलांनी आपल्या मुलीबाबत व्ही पी रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे पोलिसांनी देखील तपासाची चक्रे फिरवली होती. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सानिया खेतवाडीतून चर्नी रोड स्टेशन आणि चर्नी रोडवरुन दादर रेल्वे स्थानक येथे पोहोचली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र अचानक घर सोडून गेल्यामुळे वडिलांना काळजीत टाकणाऱ्या सानियाला व्ही पी रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मेंचेरियल मंडल जिल्ह्यात असलेल्या तिच्या गावातून मुंबईत आणले आहे. मुंबईत आणून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्या वैद्यकीय तपासात काहीही संशयास्पद आढळून आलं नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित भोसले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
मुंबई सोडण्याचे हे देखील कारण : अकरावी शिकलेली सानिया मुंबईत घरकाम करत होती; मात्र तिला मुंबई आवडत नसल्यानं तिच्या मूळ गावी तेलंगणाला गेले असल्याची माहिती सानियानं पोलिसांना दिली. मुख्यतः गरिबीमुळे सानियाकडे स्वतःचा मोबाईल फोन नव्हता. मात्र घरच्या मोबाईल फोनचा ती सतत वापर करून मोबाईलवर बोलत राहत होती. म्हणून तिचे वडील नाराज होते.
हेही वाचा: