मुंबई - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डिसेंबरमध्ये केली होती. पण, ही घोषणा केवळ घोषणा राहिली आहे. कारण लॉटरीसाठी पुरेशी घरेच म्हाडाच्या मुंबई मंडळाला सापडत नसल्याने लॉटरीला काही मुहूर्त लागत नसल्याचे चित्र आहे. नव्या घरापासून ते विखुरलेल्या घरांपर्यंत मुंबई मंडळ शोध घेत आहे. पण, यात त्यांना यश येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लॉटरीला मोठा विलंब होणार असून इच्छुकांना लॉटरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे कधी कळी मुंबईत अडीच ते पाच हजार वा त्यापेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढली जात होती. तर या लॉटरीसाठी लाखोंनी अर्ज दाखल होत होते. त्याच मुंबई मंडळाच्या लॉटरीला घरघर लागल्याचे चित्र आहे.
दीड वर्षांपूर्वी निघाली होती लॉटरी
सर्वसामान्यांसाठी हक्काच्या घराच्या स्वप्न मुंबईसारख्या महागड्या शहरात परवडणाऱ्या दरात पूर्ण करण्यासाठी एकमेव पर्याय आहे. तो म्हणजे म्हाडाच्या लॉटरीचा. त्यामुळे दरवर्षी हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्याचे डोळे म्हाडाच्या लॉटरीकडे लागलेले असतात. दरम्यान, मागील 13-14 वर्षांत एक-दोन अपवाद वगळता दरवर्षी लॉटरी काढत हजारो मुंबईकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यानुसार 2020 मध्ये मात्र लॉटरी निघालेली नाही. जून 2019 मध्ये शेवटची लॉटरी निघाली होती. त्यानंतर लॉटरी रखडलेली आहे.
म्हणून घरांचा शोध सुरू
2020 मध्ये लॉटरी निघाली नाही. तर येत्या दोन-तीन वर्षात लॉटरी निघणार नाही अशी चर्चा जून 2019 च्या लॉटरी दरम्यानच होत होत्या. असे असताना काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्र्यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत लॉटरी काढू असे जाहीर केले. खुद्द गृहनिर्माण मंत्र्यांनीच ही घोषणा केल्याने मुंबई मंडळ अडचणीत आले. त्यानंतर सुरू झाला तो घरांचा शोध. नवीन घरे कुठे सुरू आहेत, यातील कोणती घरे येत्या दोन-अडीच वर्षात पूर्ण होती याचा आढावा घेण्यास सुरूवात केली. तर विखुरलेल्या घरांचा अर्थात लॉटरीत विकल्या न गेलेल्या घरांचाही शोध सुरू केला. पण, हा शोध काही संपता संपत नसून तो कधी संपेल हा प्रश्नच आहे.
गोरेगावमधील अडीच हजार घरे लॉटरीत समाविष्ट होण्याची शक्यता
मुंबईतल्या घरांची लॉटरी काढण्यासाठी मुंबई मंडळ प्रयत्नशील आहे. त्यानुसार आतापर्यंत गोरेगाव पहाडी कुसुम शिंदे प्लॉटवरील अडीच हजार घरे पुढील दोन ते अडीच वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घरे 2021 च्या लॉटरीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. पण, अडीच हजारां पेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढण्याचा मुंबई मंडळाचा मानस आहे. त्यामुळे आणखी घरे मंडळ शोधत असून त्यात त्यांना कधी यश येते नी कधी लॉटरी जाहीर होते हाच आता प्रश्न आहे.
हेही वाचा - मुंबईत गेल्या २४ तासांत १६९ पक्ष्यांचा मृत्यू
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाचा मान राखुन आंदोलन मागे घ्या भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बोंडे याचे आवाहन