मुंबई - महानगर पालिकेच्या झोन पाचमध्ये मास स्क्रिनिंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढले जाईल. अशा सर्वांना हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जातील. यामध्ये सुरूवातीला कोरोनाबाधित आकडे वाढतील. मात्र, त्यानंतर ही परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
आज मुंबई महानगरपालिका व झोन-५ मधील सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांची नवाब मलिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. एकच परिपत्रक सर्व हाऊसिंग सोसायटींना जाईल. ते स्वतः लोकांची स्क्रिनिंग करतील. त्यामध्ये त्यांचा ताप, ऑक्सीजन लेवल तपासतील. जे गरीब आहेत, ज्या चाळी आहेत, त्यामध्ये मास स्क्रिनिंगचे काम केले जाईल. यासाठी लागणारी साधने महानगरपालिका देईल. याशिवाय यामध्ये सामाजिक व स्वयंसेवी संस्थांना जोडण्यात येईल, असेही मलिक म्हणाले. मास स्क्रिनिंगचे काम तीन वॉर्डमध्ये आजपासून सुरू झाले आहे. मास स्क्रिनिंगचे काम सुरू झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात रुग्ण बाहेर येतील, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. सध्या तीन वॉर्डमध्ये ३०० बेड उपलब्ध असल्याचे मलिक यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिका जेव्हा खासगी रुग्णालये ताब्यात घेईल, त्यावेळी तेथे दाखल रुग्णांचा सर्व खर्च महानगरपालिका करणार आहे. ज्याठिकाणी अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या आहे, त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी मदरसे आणि मस्जिदी खाली आहेत. ते स्वतःहून तयार असतील तर त्या ठिकाणांना क्वारंटाईन सेंटर म्हणून त्या वापरल्या जातील असेही मलिक म्हणाले. दरम्यान, आज हे सगळे निर्णय घेण्यात आले असून, महानगरपालिका आयुक्तांनी या निर्णयांना मान्यता दिली असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.