मुंबई - महाविकास आघाडीची आज (बुधवारी) चार वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले जाणार आहे. यापूर्वी शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब हे एकटेच पत्रकार परिषद घेणार होते. परंतु वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी राज्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोना आणि त्याच्या संसर्गामुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दुसरीकडे अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची वर्षा बंगल्यावर सकाळी बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या बैठकीला उपस्थित नव्हते. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवेसेनेचे नेते एकनाथ शिंदे आदी नेत्यांसोबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच विविध विभागाचे प्रधान सचिव या बैठकीला उपस्थित होते. राज्यात कोरोनाने कहर माजवल्यानंतर पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली.
राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीचा प्रचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चार दिवसांपूर्वी तर त्यानंतर शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली. याचदरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनीही राज्यपालांची भेट घेतली. याबैठकीत राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली.