मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर रविवारी नऊ मंत्र्यांसह अजित पवार यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. बुधवारी दोन्ही गटांकडून मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अजित पवार गटाकडे बहुसंख्य आमदार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आहे. या बैठकीच्या निमित्ताने अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील हे तीनही नेते एकत्र आले. या नेत्यांनी एकत्र येत विधानसबा अधिवेशनाची तारीख जाहीर केली. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून होत आहे. मात्र या अधिवेशनात या नेत्यांचा कस लागणार असल्याचे दिसणार आहे.
शुक्रवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठक : पावसाळी अधिवेशनाच्यापूर्वी शुक्रवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकी पार पडली आहे. बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या समितीचे सदस्य असून आजच्या बैठकीला तिघेही एकत्र आले होते. अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकत्र बैठकीस आले आहेत.
हिवाळी अधिवेशनात जयंत पाटलांचे निलंबन : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडाने मोठा भूपंक झाला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. त्यातही अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वितुष्ट उघड झाले. मात्र मागील वर्षीचे नागपूर हिवाळी आधिवेशन दोन आठवडे चालले, त्यात विरोधक आक्रमक झाले होते. आधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबनाला सामोरे जावे लागले होते.
बडव्यांना बाजूला सारा : आमचे साहेब शरद पवारच असून ते आमचे दैवत आहेत. आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबतच आहोत. मात्र शरद पवारांनी आपल्या आजूबाजूच्या बडव्यांना बाजूला सारावे, असे आवाहन नाव न घेता छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून शरद पवारांना केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा करून सभा घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र शरद पवारांनी सभा घेतल्यास आपणही प्रत्युत्तर सभा घेऊ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार आणि जयंत पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्याआधी अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघेही महत्वाची जबाबदारी पार पाडत होते. मात्र नेहमीच अजित पवार एका दिशेला तर जयंत पाटील दुसऱ्या दिशेला असायचे. पक्षात असताना कधी दोघांचे पटत नसल्याचे वारंवार समोर येत होते. अनेक संघटनेबाबत जयंत पाटील यांनी घेतलेला निर्णय अजित पवारांना मान्य होत नसल्याच्या चर्चा देखील रंगल्या. शरद पवारांच्या राजीनाम्यावर देखील दोघांचे एकमत झाले नाही. आजच्या बैठकीमध्ये विधिमंडळाच्या कामकाजाबाबत निर्णयावरती मात्र या दोघात कोणताही वाद झाला नसल्याचे दिसून आले.
हेही वाचा -