मुंबई: राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत. तर शिंदे फडणवीस सरकारचा धुळ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे. राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आमदारांना आपल्या बाजून वळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे शिंदे गट व ठाकरे गटातही संघर्षाची ठिणगी अजूनही पेटलेलीच आहे.
Live Update
भाजपच्या निष्ठावंताची मला दया येते-माझ्या पक्षाला, वडिलांनी व आजोबांनी नाव दिले. हे नाव बदलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. . महाराष्ट्र सरकारकडून रोज घोषणांचा पाऊस पडत आहे. चोर लुटारु व नामर्दांनी गर्व से कहो, असा नारा देऊ नये. मुख्यमंत्री असताना माझ्या डोक्यात मस्ती नव्हती. मोदी सर्वाधिक ताकदवान आहेत, मग पक्ष फोडण्याची वेळ का आली? तळागाळातील लढाई कार्यकर्त्यांना लढावी लागणार आहे. शिवसैनिक हाच माझा आत्मा आहे. सतरंज्या उचलणाऱ्या भाजपच्या निष्ठावंताची मला दया येते, असे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले.
सत्ताधाऱ्यांना सलाईन लावण्याची वेळ - मतदार माझ्यासठी राजा, मी मतदाराला गुलाम मानत नाही. बोगस सर्टिफिकेट घेऊन मी मते मागत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नवनीत राणा यांना लगावला. ते अमरावतीत ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत आहेत. मेळाव्याची गर्दी पाहून सत्ताधाऱ्यांना सलाईन लावण्याची वेळ आली आहे. काही बोगस लोकांकडून माझ्यावर टीका होते, असेदेखील ठाकरे यांनी म्हटले आहे.
राईट टू रिकॉलची मागणी ही अतिशय योग्य- आता खोक्यांच्या बळावर दमदाटी करून कोणीही पंतप्रधान होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. या संपूर्ण परिस्थितीबाबत मी अनेकदा विचार केला. खरंतर फार पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशात राईट टू रिकॉल असावा अशी मागणी केली होती. राईट टू रिकॉलची मागणी ही अतिशय योग्य असल्याचे आजची परिस्थिती पाहून जाणवते, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.
भुजबळांचा रोहित पवारांना टोला- खातेवाटपाची एवढी काळजी करण्याचे काम नाही. खातेवाटप लवकरच होणार आहे. मी आमदार झाल्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळे इतिहास जाणून घ्या, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांना लगावला. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. भुजबळ पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. भुजबळ हे अजित पवारांना व्हिलन बनवित असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यावर मंत्री भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सत्तेसाठी भाजपने दोन कुटुंबे फोडली- तुमच्याकडे पदे होती, तेव्हा तुम्ही विकास का केला नाही. अजित दादांचा निर्णय कुणालाच पटला नाही. भुजबळांसह ४ ते ५ जण अजितदादांना व्हिलन बनवित आहेत. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपने आमच्यात भांडणे लावली. आता भाजप भांडणाची मजा घेत आहे. सत्तेसाठी भाजपने दोन कुटुंबे फोडली आहेत. दिलीप वळसे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून उत्तर देणार आहे. कुणावरही व्यक्तीगत टीका करणार नाही, असे रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले.
- आम्ही शब्दाचे पक्के आहोत. खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी आम्ही शब्द मोडत नाही. हेच उद्धव ठाकरे यांनी शपथ घेऊन सांगितले आहे. २०१९ ला भाजपने माघार घेतल्याने ही परिस्थिती आहे. सेना भाजपबाबत उद्धव ठाकरे सर्व सत्य बोलले आहेत. राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी का उशीर करत आहेत? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
- लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. आमदारांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणं ऐकून घेण्यासाठी पुरेशी वेळ द्यायला हवी. लेखीसह तोंडी म्हणणही ऐकून घ्यावे. तसेच वकिलामार्फत देखील युक्तिवाद करण्यास वेळ वाढवून मिळावा, असे मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसबाबत म्हटले आहे. याबाबत शिंदे गटाने आज बैठकदेखील बोलाविली आहे.
- उद्धव ठाकरे आज अमरावतीत दौऱ्यात येण्यापूर्वीच नवनीत राणा व रवी राणा दाम्पत्य आक्रमक झाले आहेत. गर्ल्स हायस्कूल चौकात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने म्हटले आहे. ठाकरे गट व राणे दाम्पत्य यांच्या समर्थकांनी एकमेकांचे बॅनर फाडले आहेत.
मोदी यांचा करिष्मा ओसरला-उद्धव ठाकरे-शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यात दौरा सुरू केला आहे. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भातील दौऱ्यात त्यांनी पहिल्या दिवशी यवतमाळला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी शिंदे गटासह भाजपचा खरपूस समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, की एक राष्ट्र, एक पक्ष योजना स्वीकारली जाणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा ओसरला असल्याचे दिसत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिसून आल्याचा त्यांनी दावा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद वाटपाचा करार पाळण्यास नकार दिला. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता, असे ठाकरे यांनी म्हटले.
भुजबळ यांनी पवारांना दिला इशारा- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट यांच्यात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवला मतदार संघात सभा घेतल्यानंतर सत्तेतस सहभागी झालेले राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे संतप्त झाले. त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार साहेब, येवल्यात का आले होते? हे मला समजू शकले नाही. राष्ट्रवादीतील बंडखोरीला मी जबाबदार नसून तुमच्या कुटुंबातच हे घडले, असा टोला लगावला. दिल्लीत भाजप आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलण्याकरिता संधी देण्यात आली नाही, यावर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगून एकप्रकारे भुजबळ यांनी पवारांना इशारा दिला आहे.
आगामी निवडणुकांची चिंता नाही- दिलीप वळसे पाटील- दुसरीकडे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी पीए व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार गटात सहभागी झाल्याबाबत प्रतिक्रिया दिली. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना वळसे पाटील म्हणाले की, माझे राजकीय अस्तित्व हे पवार साहेबांमुळेच आहे. आपली ईडी, सीबीआय किंवा प्राप्तिकर विभागाकडून कधीही चौकशी झाली नाही. जेव्हा शरद पवार आंबेगावला येतील तेव्हा तुम्ही सर्वांनी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे वळसे पाटील यांनी आवाहन केले. मला आगामी निवडणुकांची चिंता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राज्य मंत्रिमंडळात नऊ आमदार सहभागी झाले आहेत. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचादेखील समावेश आहे.
हेही वाचा-
- Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांवर टांगती तलवार? ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 14 जुलैला सुनावणी
- NCP Political Crisis : जे झाले, ते घरातूनच झाले; भविष्यात तेलगीप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणार, छगन भुजबळांचा शरद पवारांना इशारा
- Maharashtra Political Crisis : 'भाजपला राष्ट्रवादी फोडण्यात अपयश आले तर..', पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान