राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, सोमवारी कामकाज समितीची बैठक - विधीमंडळ कामकाज समिती
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावरही कोरोना संसर्गाचे सावट पसरले आहे. त्यामुळे, नियोजनानुसार 22 जूनपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता असून यासंदर्भात सोमवारी विधीमंडळ कामकाज समितीची बैठक होणार आहे.
मुंबई - येत्या 22 जूनपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आले असले तरी या अधिवेशनवरही कोरोनाचे सावट आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून या स्थितीत अधिवेशन बोलावणे संयुक्तिक होईल का, यासंदर्भात 18 मे रोजी विधीमंडळ कामकाज समितीची बैठक होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच 9 मार्चला राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर तातडीच्या उपाययोजना करत सरकारने काही निर्बंध लावले. तसेच अधिवेशन संपायला दोन दिवस असताना अधिवेशनही संस्थगित करण्यात आले. या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून राज्यातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. केवळ 5 टक्के कर्मचाऱ्यांच्या आधारावर राज्याचा प्रशासकीय कारभार सुरू आहे. राज्यात आत्तापर्यंत (14 मे) 27 हजार 523 रुग्णांची नोंद झाली असून 1 हजार 19 बधितांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून राजधानी मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे.
मुंबईत 14 मे रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 हजार 579 वर पोहोचला असून 621 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या लॉकडाउनची घोषणाही केली आहे. त्यामुळे 22 जूनच्या आसपास राज्यातली स्थिती न सुधारल्यास पावसाळी अधिवेशनही बोलावता येणार नाही. अधिवेशनासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तसेच कर्मचारी वर्गही नियुक्त करता येणार नाही. दरम्यान, या कालावधीत मंत्रालयातल्या प्रधान सचिवांसह सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुके या स्थितीवर विधिमंडळ कामकाज समितीची सोमवारी बैठक होणार असून या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.