मुंबई - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी तसेच देशभरातून आलेल्या नागरिकांनी गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, वांद्रे बँडस्टँड, यासह मुंबईतील विविध समुद्रकिनारी आणि प्रेक्षणीय ठिकाणी मोठी गर्दी केली. रात्री बाराच्या ठोक्याला 2025 या नवीन वर्षाचं स्वागत करताना जमलेल्या हजारो नागरिकांनी एकच जल्लोष केला.
मुंबईला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईतील समुद्रकिनारी आणि सार्वजनिक स्थळांवर फटाके उडवण्यास, आकाश कंदील सोडण्यास मुंबई पोलिसांनी प्रतिबंध केला होता. तसेच गेट वे ऑफ इंडिया येथे आतषबाजी आणि रोषणाई न केल्यानं उपस्थितांनी त्याबाबत काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईच्या विविध भागातून, राज्याच्या विविध जिल्ह्यातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून, भोपाळ, इंदूर, बुलढाणा, नाशिक येथून आलेल्या नागरिकांनी मुंबईत गर्दी केली होती.
फटाके उडवण्यावर बंदी - गेट वे ऑफ इंडिया येथे नागरिकांना आत जाण्यास बंदी घालण्यात आली होती. फटाके वाजवण्यास बंदी घातल्यानं तसेच रोषणाई करण्यात आलेली नसल्यानं उपस्थितांपैकी काही जणांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई पोलिसांनी उडते आकाश कंदील, ड्रोन उडवण्यावर आणि फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात आली होती.
- वांद्रे रिक्लेमेशन येथे नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आकर्षक आणि नयनरम्य रोषणाई करण्यात आली. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी इथे विविध कलाकारांद्वारे कार्यक्रम सादर करण्यात आले. या ठिकाणी तब्बल 65 फूट ख्रिसमस ट्री बनवण्यात आला. हा ट्री पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. आकर्षक रोषणाई, सुगम संगीत यामुळे आपसूक उपस्थितांनी संध्याकाळपासून येथे आपली पावले वळवली.
- नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्यांमध्ये तरुणाईची मोठी संख्या होती. कुटुंबिय, नातेवाईक, मित्र परिवारासहित अनेकांनी नववर्षाचे स्वागत केले. सह पोलीस आयुक्त सत्यनारायण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशी मीना, पोलिस उपायुक्त डॉ प्रवीण मुंडे, पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी नरीमन पॉइंट येथील गर्दीवर लक्ष ठेवून होते.
अकरा वाजल्यानंतर नागरिकांचे लोंढे- रात्री सव्वा अकरा वाजल्यानंतर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांचे लोंढे नरीमन पॉइंटकडे येण्यास प्रारंभ झाला. मुंबई पोलिसांनी गेट वे ऑफ इंडिया, नरीमन पॉइंट सहित विविध गर्दीच्या ठिकाणी ड्रोन कँमेऱ्यांद्वारे टेहळणी करत बारीक लक्ष ठेवले होते. मोठ्या संख्येनं नागरिक नववर्षाच्या स्वागतासाठी नरीमन पॉइंट, गिरगाव चौपाटी परिसरात एकवटल्यानं या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र होते.
हेही वाचा