मुंबई - अर्थसंकल्पी अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. पुरवणी मागण्या सादर होत असताना विदर्भ-मराठवाडा वैधानिक विकास मंडळ तयार करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. मात्र जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बारा आमदारांच्या पत्रावर सही करत नाहीत. तोपर्यंत विदर्भ-मराठवाडा विकास मंडळ तयार करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घालत राज्यपाल आणि विदर्भ-मराठवाडा विकास मंडळ याचा संबंध काय? असा प्रश्न उपस्थित केला.
जर राज्य सरकारने विदर्भ-मराठवाडा विकास मंडळ तयार करून त्यांना निधी दिला नाही तर, तो आम्ही संघर्षाने मिळवू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तर या वैधानिक विकास मंडळाची विदर्भ-मराठवाड्याच्या जनतेला गरज असून सर्वच क्षेत्रात मागे असलेल्या क्षेत्रातील गरीब जनतेला या निधीमुळे मदत होते. त्यामुळे हा निधी विदर्भ मराठवाड्याच्या जनतेला मिळावा म्हणून ही मंडळ तयार करण्यात यावी, अशी विनंती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
हेही वाचा - आजपासून मुंबईकरांचा टॅक्सी-रिक्षाचा प्रवास महाग; नाईटसाठी अधिक भाडेवाढ
हेही वाचा - मुंबईत लसीकरणाला सुरुवात नाही; अपडेट झालेल्या 'कोविन अॅप'मध्ये तांत्रिक अडचणी