मुंबई - मागील काही महिन्यात मंत्री आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच आता राज्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. रविवारी रात्री त्यांचा चाचणी अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. संजयकुमार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनची बाधा झाल्यानंतर मुख्य सचिवांनी खबरदारी म्हणून आपली चाचणी करून घेतली होती.
मागील काही दिवसांमध्ये मुख्य सचिवांनी मंत्रालयात विविध नियोजनासंदर्भात अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क आला असल्याचे बोलले जात आहे. तूर्तास त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने सध्या ते आपल्या निवासस्थानी क्वारंटाइन झाले आहेत. तसेच, त्यांनी आपल्या निवासस्थानातूनच कामकाज सुरू केले असून आपली प्रकृती अगदी ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.
तथापि, मंत्रालयात शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील तब्बल डझनभराहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ हे आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्या मंत्रालयातील दालनेही बंद ठेवण्यात आली आहेत. आता राज्याचे प्रधान सचिवच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनाही क्वारंटाइन व्हावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.