मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी अनेक नव्या घोषणा केल्या. यात सांस्कृतिक कार्य विभागासाठी 161 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी मोठी तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात आठ प्राचीन मंदिरांचे संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी 101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या संस्कृतीचे जनत करणे आपले आद्य कर्तव्य आहे.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकासालाही पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच पोहरादेवीसह राज्यातील परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी विशेष निधी दिला जाणार आहे. खंडेरायाची जेजूरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीगडासाठी, सांगलीतील बिरुदेव देवस्थानाच्या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात स्मारक उभारणार येणार आहे. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली इतिहास दर्शविणारे, कला व सांस्कृतिक घडामोडींचे महासंस्कृती केंद्र ठरवणारे असे महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
साखर संग्रहालय-पुण्यातील साखर संकुलात सुमारे 40 कोटी रुपये खर्चून साखर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. अमरावतीलमधील संत गाडगेबाबा निर्वाणभूमी, वलगांवमध्ये मूलभूत सुविधा आराखड्यांकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच 2021 हे संत नामदेव महाराज यांचे 750 वे जयंती वर्ष आहे. या निमित्ताने संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र नरसी नामदेव या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.