मुंबई Mahadev Book App Scam : सरकारी योजनांचं आमिष दाखवत बँक खाती उघडून सट्टेबाजीचे २००० कोटी रुपयांहून अधिकचे व्यवहार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या मृगांक मिश्रा याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती. तो दुबईहून भारतात येताच पोलिसांनी त्याला पकडलं. राजस्थानच्या प्रतापगड पोलिसांनी मे २०२३ मध्ये या प्रकरणाचा खुलासा केला होता. 'महादेव बुक' नावाच्या अॅपद्वारे हा सर्व प्रकार चालवला जात होता. यापूर्वी चित्रपट अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री सनी लिओन यांना या प्रकरणी ईडीनं समन्स बजावलं होतं. यामध्ये मृगांक मिश्राचाही समावेश होता.
सात दिवसांची पोलीस कोठडी : प्रतापगड पोलिसांनी मे महिन्यात आयपीएल सट्टेबाजीच्या पैशाच्या व्यवहारासाठी लोकांची बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच चार जणांना अटक केलीय. दुबईत बसून हा संपूर्ण व्यवहार चालवणाऱ्या टोळीचा म्होरक्या मृगांक मिश्रा शनिवारी मुंबई विमानतळावर पोहोचला. विमानतळावर त्याची चौकशी केल्यानंतर प्रतापगड पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुंबईत पोहोचलेल्या प्रतापगड पोलिसांच्या पथकानं मृगांक मिश्राला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर : आरोपी मृगांक मिश्रा आयपीएल सट्टेबाजीचे पैसे बनावट खात्यांमध्ये हस्तांतरित करायचा. हे पैसे सट्टेबाजी करणारे ग्राहक आणि दलालांना पाठवले जात होते. या व्यवहारांसाठी व्हॉट्सअॅपवर ग्रुपही तयार करण्यात आला होता. या ग्रुपचं चॅटिंग पोलिसांनी हस्तगत केलंय. महादेव सट्टेबाजीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. ईडीनं या प्रकरणात रणबीर कपूर आणि कपिल शर्मासारख्या सेलिब्रिटींना समन्स पाठवले होते.
२००० कोटींहून अधिक रुपयांची सट्टेबाजी : 'महादेव बुक' नावाच्या या अॅपवर काही महिन्यांतच देशभरातून १२ लाखांहून अधिक लोक जोडले गेले होते. क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत सगळ्यावर सट्टेबाजी करण्यासाठी लोकांनी या अॅपचा वापर केला. कोरोना महामारीनंतर या अॅपचा व्यवसाय वेगानं वाढला. २०२१ मध्ये कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांविना आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महादेव अॅपच्या माध्यमातून २००० कोटींहून अधिक रुपयांची सट्टेबाजी करण्यात आली होती. या टोळीनं देशभरात ६८ बनावट खात्यांद्वारे व्यवहार केले होते. आतापर्यंत पोलिसांनी या खात्यांमधील सुमारे ४ कोटी रुपये जप्त केले आहेत.
हेही वाचा :