अहमदनगर - शिर्डी देवस्थान येथे रविवारी पाळल्या जाणाऱ्या बंदबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ बैठक घेऊन तोडगा काढायला हवा, अशी अपेक्षा भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केली आहे. साईबाबांसारख्या दैवी विभूतीच्या जन्म आणि मृत्यूबाबत निश्चित माहिती मिळवता येणं, शक्य नसल्याने याबाबतचा वाद लवकरात लवकर मिटवायला हवा, असे मत भांडारी यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर परभणी येथील पाथर्डीमधील साईबाबांच्या जन्म स्थळाला 100 कोटी रुपये देऊन त्यांचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे साईबाबांच्या शिर्डीचे धार्मिक महत्व कमी होण्याची शक्यता असल्याने या निर्णयाला विरोध करण्यासाठी रविवारी शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, हा वाद चिघळण्यापूर्वीच दोन्ही गटांची एकत्रित बैठक बोलवून या वादावर तोडगा काढावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे.
सावरकाराबाबाबत शिवसेनेच्या भूमिकेत बदल
हिंदुत्वाची कास धरून पुढे जाणाऱ्या शिवसेनेने आजवर कधीही सावरकरांचा अपमान खपवून घेतला नव्हता. मात्र, आता काँग्रेससोबत घरोबा केल्यापासून या मुद्द्यावर पक्षाने मवाळ भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. एकीकडे शिवरायांच्या वारसांना ते वारस असल्याचे पुरावे मागणाऱ्या शिवसेनेने याबाबत संजय राऊत यांचं हे वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण दिलेले नव्हते. मात्र, सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मांडलेली भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्टीकरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने पक्षाच्या ध्येयधोरणापासून पूर्णपणे फारकत घेतली असल्याचे हे उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी सेनेवर जाहीर टीका केली.
'हिंदुत्ववादी भूमिका ही कपडे बदलण्याएवढी सोपी गोष्ट नाही'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 23 जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या महाधिवेशनाकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत. या महाधिवेशनाची भगव्या रंगातील भव्य होर्डिंग्ज आता मुंबईत जागोजागी दिसायला लागली आहेत. त्यामुळे मनसे हिंदुत्वाची कास धरणार, अशी चर्चा सर्वत्र सुरु असली तरीही हिंदुत्ववादी विचार ही कपडे बदलण्याएवढी सोपी गोष्ट नाही, असे म्हणत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी याबाबत अधिक काही बोलणे टाळले.