मुंबई - मुंबईत २९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त मतदान आपल्या पारड्यात पडावे, यासाठी नेतेमंडळी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. काल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त एकनाथ गायकवाड, मिलींद देवरा, राहुल शेवाळे, मनोज कोटक तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे त्याप्रमाणे लोकांमध्ये दिसण्याची कोणतीही संधी उमेदवार सोडत नाहीत. काल रात्रीपासूनच आंबेडकर जयंतीच्या जल्लोषाला सुरुवात झाली. अनेक उमेवारांनी विविध परिसरातील बुद्ध विहारात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. ईशान्य मुंबईत निहारिका खोदले, संजय पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील, मनोज कोटक यांनी विक्रोळी येथील बुद्धविहारात हजेरी लावली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत. ते आपल्या संविधानाचे निर्माते आहेत. त्यांनी लिहिलेल्या संविधानावर आज आपण चालत आहोत. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज मी इथे आलो आहे, असे मनोज कोटक यांनी सांगितले.
१४ एप्रिलला रात्रीपासून भीमजयंती जल्लोष सूरु होतो. जगाच्या कानाकोपऱ्यात जयंती साजरी होते. बाबासाहेबांनी आम्हाला जगण्याचा हक्क आणि सन्माम दिला आहे. मी दरवर्षी चैत्यभूमी येथे येतो. काल रात्री चेंबूर येथे असलेल्या जयंती कार्यक्रमात ही सहभागी झालो होतो असे एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.