मुंबई - कोरोनोच्या संकटामुळे आज महाराष्ट्रासह देश अडचणीत आला आहे. या संकटाच्या सामना आज सर्वच जण एकत्रितपणे करित आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. तरीही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीला सामाजिक माध्यमांमध्ये असंदीय शब्दात टीका केली जात आहे. याविरोधात भाजपच्या एका शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.
देवेंद्र फडणीसांवर घाणेरडी, अश्लिल व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. ही टीका अत्यंत हीन दर्जाची आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तसेच राज्याच्या राजकारणातील लोकाभिमुख सुसंस्कृत व निश्कलंक नेतृत्व आहे, परंतु याचे भान न ठेवता काही भाड्याच्या एजन्सी व काही विकृत मानसिकता असणारे हा गलिच्छ प्रकार करित आहेत, त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व फेसबुक पोस्ट व कमेन्ट टाकणाऱ्या या समाजकंटकाविरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आज विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांकडे केली. मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे देण्यात आलेले हे निवेदन तातडीने पोलीस आयुक्तांकडे पाठविण्याची सूचना दरेकर यांनी यावेळी उपायुक्त स्वामी यांना केली.
दहिसर पूर्व येथे पोलीस उपायुक्त स्वामी यांची आज भाजपच्या आमदारांनी भेट घेतली. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्वामी यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, आमदार मनिषा चौधरी, आमदार सुनिल राणे, भाजपा उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या विरुध्द समाजमाध्यमांमध्ये सुरू असलेली असंसदीय टीका बंद होईल, अशी आमची अपेक्षा होती, पण तरीही हीन दर्जाची टीका सुरू राहिल्यामुळे आज आम्ही ही तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याने समाजमाध्यमांवर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याच्या विरुध्द तातडीने कारवाई करण्याची तत्परता पोलिंसाकडून दाखविली जात आहे. जर कायदा सर्वांना समान असेल तर फडणवीस यांच्याविरुध्द पोस्ट टाकणाऱ्या विकृत प्रवृत्तीविरुध्द आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.