मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत आहेत. भाजप नेते किरीट सोमैय्या आणि ईशान्य मुंबईतील युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी चैत्यभूमीवर येवून महामानवाला अभिवादन केले. काँग्रेसने फक्त बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याच्या वल्गना केल्या. मात्र, भाजपने स्मारक बांधण्याचे काम सुरु केल्याचे किरीट सौमय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
भाजप सरकार संविधान, आस्था आणि विश्वास यांची रक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे. या बाबतची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारच्या काळात इंदू मील स्मारकाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. पुढील ५ वर्षांच्या काळात येथे स्मारक उभे राहिल्याचे दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सरकार घटनेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे. मात्र, काँग्रेस आणि विरोधी पक्ष भ्रम तयार करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधानाचे निर्माते आहेत. त्यांनी लिहिलेल्या संविधानावर आज आपण चालत आहोत. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज मी इथे आलो आहे, असे युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी सांगितले.