मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबई हॉटस्पॉट झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी कमी पडत आहेत. त्यातच अनेक आरोग्य कर्मचारी कामावरच येत नसल्याचे समोर आले आहे. अशा कर्मचाऱ्यांना नोकरी करायची नसेल तर त्यांना कायमस्वरूपी घरीच बसवावे, असे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत सध्या कोरोनाचे 39464 रुग्ण आहेत. तसेच 1279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 16794 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजही हजारो रुग्ण पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, आया, वॉर्डबॉय आदी. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असताना काही कर्मचारी कोरोनाच्या भीतीने कामावरच येत नसल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये अनेक निवृत्त डॉक्टर, कर्मचारी पालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्यासाठी पुढे येत आहेत. असे असताना पालिकेच्या रुग्णालयात काम करणारे आणि पालिकेचा पगार घेणारे काही कर्मचारी कामावर हजर न होता घरीच राहत असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांना नोकरी करायची नसल्यास त्यांना कायमस्वरूपी घरी बसवून त्यांच्या जागी काम करू इच्छिणाऱ्या लोकांची नियुक्ती करावी, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.