मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून तो साजरा केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, लवकरच अजित पवार मुख्यमंत्रीपदी अशा प्रकारच ट्विट केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात अमोल मिटकरी म्हणाले की, आमच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना असून यात काहीही गैर नाही. यामुळे कोणी नाराज होण्याचे कारण नसल्याचा टोला शिंदे गटाला लगावला आहे.
अजित पवारांचा देखील सँडविच होण्यास वेळ लागणार नाही : भारतीय जनता पक्षाची कूटनीती पुन्हा एकदा राज्याला दिसून आली आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून परंपरागत साथी असलेल्या शिवसेना पक्षात फूट पाडून उद्धव ठाकरे गटाला संपून टाकले आणि एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तेत आले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोईजड होतात की काय याची भीती वाटू लागल्याने, अजित पवारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे काम भाजपने केले आहे. अजित पवार गटाला भाजपकडून लॉलीपॉप देण्याचे काम सुरू आहे. वारंवार सांगितले जात आहे की, अजित पवारांना मुख्यमंत्री करू अशा प्रकारचा मेसेज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पोहोचविला जात असल्याचा आरोप, काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.
अनेक ठिकाणी बॅनरबाजी : उत्साहाच्या भरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी बॅनरबाजी करून अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत आहेत. भारतीय जनता पक्षाचा हा चॉकलेट देण्याचा भावनिक कार्यक्रम आहे. राज्यातील भावनिक राजकारणाचे दिवस सध्या संपलेले आहेत. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने याचे भान ठेवणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाच्या चॉकलेटच्या अमिषाला बळी पडून ज्याप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सँडविच झाला आहे. त्याप्रकारे अजित पवारांचा देखील सँडविच होण्यास वेळ लागणार नाही असाही दावा, काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.
मिटकरी फारच उतावीळ : अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी अमोल मिटकरी फारच उतावळे झालेले दिसतात. उथळ पाण्याला खळखळाट फार असेच मिटकरींचे वर्तन आहे.
आपण महायुतीतील एक घटक पक्ष आहोत याचे तारतम्य मिटकरींनी पाळले पाहिजे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असे मिटकरी यांचे झाले असे म्हणत, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी उपरोधिक टीका केली.
शिंदे गटात अस्वस्था पसरली : मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते वारंवार दावा करत असताना, शिंदे गटात मात्र अस्वस्था पसरली आहे. महायुतीचे सरकार असल्यामुळे भाजपासोबत शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला समजूतदारपणेच काम करावे लागणार आहे. त्यामुळे अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न केव्हा पूर्ण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -