मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात सुरु असतानाच उद्या (मंगळवार) नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) कडून जेईई (मेन) आणि नीट (युजी) या सामायिक प्रवेश परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या देशात सर्वाधिक असूनही २ लाख २८ हजार ९१४ विद्यार्थ्यांना तब्बल ६१५ परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा द्यावी लागणार आहे. दुसरीकडे जेईईची (मेन)च्या परीक्षेला राज्यातून १ लाख १० हजार ३१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून हे विद्यार्थी राज्यात ७४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. देशातील सर्वाधिक ६१५ परीक्षा केंद्र महाराष्ट्रात आहेत.
हेही वाचा-ई-पास रद्द, राज्य सरकारचा निर्णय; अनलॉक 4 साठी नवी नियमावली जाहीर
जेईई-नीट परीक्षा देणाऱ्या सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या ही मुंबई, पुणे आदी शहरातील विद्यार्थ्यांची आहे. त्यांच्या प्रवासासंदर्भात राज्य सरकारकडून ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. मुंबईतील या परीक्षांसाठी एसटी-बेस्टच्या प्रवासाला मुभा असली तरी रेल्वेकडून सायंकाळपर्यंत कोणताही आदेश काढण्यात आला नव्हता. मुंबई, ठाण्यातील नामांकित क्लासेसवाल्यांनीही आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची सोय केली नसल्याने यासाठीची सर्व खबरबदारी पालकांना घ्यावी लागणार आहे.
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईई या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती, परंतु त्या मागणीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने उद्या लाखो विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. देशभरात जेईई (मेन) ही परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत तर नीट (युजी) ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांना आपल्या आवडीनुसार परीक्षा केंद्र आणि त्याची निवड करण्याची संधी एनटीएकडून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
देशभरात होणाऱ्या नीट (युजी) या परीक्षेला १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा देशातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर आयोजित केली जाणार आहे. या परीक्षांसाठीची सर्वाधिक ६१५ परीक्षा केंद्र महाराष्ट्रात आहेत. येथूनच तब्बल २ लाख २८ हजार ९१४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
जेईई (मेन)च्या परीक्षेला देशभरातून ९ लाख ५३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ही परीक्षा देशभरात ६६० परीक्षा केंद्रावर होणार आहे. तर राज्यात या परीक्षेला १ लाख १० हजार ३१३ विद्यार्थी बसणार असून ही परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर या कोरोनाचा कहर सुरू असलेल्या प्रमुख शहरांतील ७४ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.