मुंबई - पवारसाहेबांच्या आशिर्वादाने ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला, असे लोक स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात आहेत. अशा लोकांना येत्या काळात नवी मुंबईची जनता नक्कीच धडा शिकवेल असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजीत नवी मुंबईच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.
नगरसेवक जात आहेत म्हणून त्यांच्या मागे मी चाललो आहे, असे सांगणारे लोक कधीच नेते होऊ शकत नाहीत. स्वार्थापोटी पक्ष सोडून जाणार्या लोकांना नवी मुंबईची जनता कधीच लक्षात ठेवणार नाही. त्यांना येत्या काळात नक्कीच धडा शिकवेल असे पाटील म्हणाले. अनेकजण तर कोणत्या ना कोणत्या चौकशीच्या भीतीने जात आहेत. एका बाजूला सत्ता उपभोगता आणि दुसरीकडे सत्ता गेल्यावर दुसर्या पक्षात जाता असे म्हणत पाटील यांनी पक्षांतर करणाऱ्यांना लक्ष्य केले.
मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला
भारतातील मंदीचा सर्वात जास्त फटका हा आपल्या महाराष्ट्राला बसत आहे. दोन कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो म्हणणार्या सरकाराच्या काळात रोजगार तर मिळालाच नाही मात्र, अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. तेव्हा आपण कोणाच्या पाठीशी राहायचे ते आता आपण ठरवले पाहिजे असेही पाटील म्हणाले.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या अर्थकारणात मंदीचा परिणाम दिसत आहे. मंदी सामान्य माणसाच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सांगत होतो की नोटबंदी, GST सारखे चुकीचे निर्णय घेण्यात आल्याचेही पाटील म्हणाले.