मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची लागण मुंबईतील आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि पत्रकारांनादेखील झाली आहे. यापाठोपाठ आता या विषाणूने राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकारी रहात असलेल्या 'यशोधन' या इमारतीतही शिरकाव केला आहे. यामुळे, पालिकेने इमारत सील करुन इमारतीमधील सर्वांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईनचे आदेश दिले आहेत.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत 22 हजार 563 रुग्ण आहेत. त्यात हजारहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच शेकडो डॉक्टर, नर्स, आरोग्य आणि सफाई कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग आयएएस आयपीएस अधिकारी राहत असलेल्या चर्चगेट येथील यशोधन इमारतीत झाला आहे. त्यामुळे पालिकेने आपल्या नवीन नियमावलीप्रमाणे इमारतीचा काही भाग सील केला आहे. तसेच इमारतीमधील सर्व रहिवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने इमारतीत बाहेरील व्यक्तीला, कामवाली बाई, धोबी, दूधवाला आदी लोकांना प्रवेश देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. इमारतीमध्ये निर्जंतुकीकरण करावे, गर्दी करू नये, मास्कचा, सॅनिटायझरचा वापर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. सील केलेल्या भागातील रहिवाशांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सोसायटीने करावा तसेच इमारतीमधील कोणाला कोरोनाची लक्षणे, ताप, सर्दी, खोकला आढळून आल्यास पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.