मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींवर कडक कारवाई केली जावी आणि सर्व खातेधारकांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी पीएमसी बँक खातेधारकांनी आज (5 जानेवोरी) बँकेचे संचालक दलजीत बल यांच्या ट्रॉम्बे मानखुर्द येथील घरावर मोर्चा काढला.
आर्थिक अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. पीएमसी बँकचे आर्थिक व्यवहार बंद होऊन 100 दिवसांचा कालावधी उलटला आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी दलजीत बल यांच्या घराबाहेर ठिय्या देत आपला रोष व्यक्त केला आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : अध्यक्ष वरियंम सिंग यांच्या घराबाहेर आंदोलन
यावेळी, पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आंदोलकांनी घराबाहेर 'दलजीत बल चोर है'च्या घोषणा देत घराच्या भिंतीवर 'चोर' लिहले आणि बल यांच्या पोस्टरला काळे फासले. दलजीत बल यांना वारंवार जामीन मिळत आहे. त्यांचा जामीन कोर्टाने नाकारावा, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. बल यांनी जमवलेली संपत्ती गुंतवणूकदारांच्या पैशांतून जमवली असल्याचा आरोपही यावेळी आदोलकांनी केला आहे.