मुंबई- आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस आहे. देशात सर्व प्रकारचे दिवस साजरे केले जातात. मात्र, पुरुष दिवस कुठे साजरा होताना दिसत नाही. कारण पुरुष मन खोलून वावरताना दिसत नाहीत. बोलताना दिसत नाहीत. पुरुषांना अनेक समस्या असतात. मात्र, ते कोणाला बोलून देखील दाखवत नाहीत. त्यासाठी पुरुषांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणजेच पुरुष आयोग उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणी आज या दिनानिमित्त पुरुषांनी केली आहे.
हेही वाचा- सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू
पुरुष जन्माला येतो तेव्हापासून त्याला पुरुष असण्याची जाणीव करून दिली जाते. काय रडतो आहेस मुलींसारखा, किंवा काय झालं मुलगी आहेस का, ही वाक्य वारंवार ऐकवली जातात. मुलगा लहानाचा मोठा होतो. तेव्हा स्वतःच्या मनाला तू पुरुष आहेस असे सांगतो. तुला कधीच काही होता कामा नये. तू तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहीजे. तुला मोकळेपणाने रडायला परवानगी नाही. तुला हताश होऊन चालणार नाही. कुठल्या कठीण परिस्थितीत न डगमगता पुरुषाने सामोरे जायला हवे, असे मनावर बिंबवलेले असते.
पुरुषांना प्रश्न, समस्या असू शकत नाही, असे नाही आणि ज्याला आहे ती जणू काही कमजोर असल्याची भावना समाजात रुजलेली आहे. पुरुषांना अनेक समस्या असतात. मात्र, तो कोणाशी व्यक्त होत नाही. त्याबाबत तक्रार देखील करत नाही. यासाठी मुंबईतील पुरुषांची मते आम्ही जाणून घेतली. यावेळी बोलताना पुरुषांना आपल्या समस्या, भावना व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हायला हवं, असे मत पुरुषांनी व्यक्त केले.
लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत प्रत्येक पुरुषाला अनेक समस्या असतात. नोकरीचा ताण, कर्जबाजारीपणा, लग्नाची समस्या, कामाचा व्याप, कोणाकडून होणारा छळ, शिक्षण यामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांची, पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी पुरुष आयोगाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. या पुरुष आयोगाची लवकरात लवकर स्थापना व्हावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसानिमित्त मुंबईतल्या पुरुषांनी केली आहे.