मुंबई- कोल्हापूरच्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी मातोश्रीवर जावून भेट घेतली. एकनाथ शिंदे यावेळी उपस्थीत होते. शिवसेनेचे संख्याबळ आता 64 वर पोहोचले आहे.
यद्रावकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपला पाठींबा जाहीर केला. राज्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते, हा विश्वास असल्यानेच शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे यद्रावकर म्हणाले. शिरोळ आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आणि ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.