मुंबई - कांदिवली मधील फायरिंगमागे अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच आरोपी रोहित चंद्रशेखर पाल याचे मृताच्या पत्नीशी संबंध होते. याच संबंधातून त्याने उत्तरप्रदेशातून मुंबईत आल्यानंतर तिच्या पतीची गोळ्या झाडून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आता या प्रकरणी हत्येच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर मनोजला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी मनोजची कांदिवलीतील एकतानगर, महिला आधार केंद्राजवळ एका अज्ञात मारेकर्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर मारेकरी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती. मारेकर्याची ओळख पटल्यानंतर तो पाटना एक्सप्रेसने उत्तरप्रदेशला पळून गेला होता. ही माहिती प्राप्त होताच कांदिवली पोलिसांनी उत्तरप्रदेश रेल्वे पोलिसांच्या मदतीने गोळीबार करणार्या रोहित पाल याला प्रयागराज रेल्वे स्थाकातून अटक केली.
चौकशीत त्यानेच मनोजची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुली नंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत मनोजची पत्नी आणि दोन मुले उत्तरप्रदेशातील गावी राहतात. तिचे आरोपी रोहितसोबत अनैतिक संबंध होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. मात्र पोलिसांच्या हाती पुरावे आणि धागेदोरे लागल्याने त्यांच्यासाठी हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढणे आता सोपे झाले आहे.
या संबंधाची माहिती मनोजला समजल्यानंतर त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर मनोज मुंबईत आला होता. २ जूनला तो पुन्हा उत्तरप्रदेशात जाणार होता. तो उत्तरप्रदेशात येण्यापूर्वीच रोहितने त्याची मुंबईत येऊन गोळ्या झाडून हत्या केली होती. रोहितला अटक केल्यानंतर त्याची पोलिसांनी चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात मनोजच्या पत्नीचा सहभाग आहे का? याचा आता पोलीस तपास करत आहेत. लवकरच तिची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे बोलले जाते. या चौकशीनंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे.