मुंबई - येथील बंद ठेवण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. पण आता या निर्णयाला खागसी डॉक्टरांनी जोरदार विरोध केला आहे. पीपीई किटची उपलब्धता नसणे आणि इतर कारणांमुळे रुग्णालये बंद आहेत. त्यामुळे किती रुग्णालये उघडी आहेत, किती बंद आहेत, बंद असलेली रुग्णालये का बंद आहेत याचे सर्व्हेक्षण करा. तसेच, जे कोणत्याही कारणाशिवाय रुग्णालये बंद ठेवत आहेत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने घेतली आहे. त्यामुळे आता पालिका आणि आयएमएमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनपासून मुंबईतील खासगी डॉक्टरांनीही आपले रुग्णालय, नर्सिंग होम आणि क्लिनिक बंद केले आहेत. त्यामुळे नॉन-कोव्हीड रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यांना दूर सरकारी-पालिका रुग्णालयात जावे लागत असून तिथे त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता बळावत आहे. ही बाब लक्षात घेता गेल्या कित्येक दिवसांपासून पालिका आणि राज्य सरकार खासगी डॉक्टरांना रुग्णालये सुरू करण्याच्या सूचना, विनंती करत आहेत, आदेश देत आहेत. मात्र, त्यानंतरही मुंबईत खासगी रुग्णालये बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी आता सर्व विभागीय सहायक आयुक्तांना दिले आहेत.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी मात्र, यावर आक्षेप घेतला आहे. मुंबईत अंदाजे 30 हजार खागसी डॉक्टर आहेत. यात 15 हजार अॅलोपॅथी तर, बाकी इतर डॉक्टर आहेत. तर 15 हजारातील 10 अॅलोपॅथी डॉक्टर आयएमएचे सदस्य आहेत. या 10 हजारपैकी मोठ्या संख्येने डॉक्टर रुग्णालयाशी संलग्न आहेत. त्यामुळे ते काम करतच आहेत. सरकारच्या निर्देशानुसार 65 वर्षावरील आणि ज्यांना काही गंभीर आजार आहेत त्या डॉक्टरांचे रुग्णालय बंद आहेत. तर काहींना पीपीई किटच उपलब्ध होत नसल्याने तर काहींकडे मनुष्यबळ नसल्याने रुग्णालये बंद आहेत. हीच परिस्थिती आयएमए व्यतिरिक्त डॉक्टरांची आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा सर्व्हे करावा आणि मग पालिकेने कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
राज्य सरकारने नुकतीच खासगी डॉक्टरांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीने बंद रुग्णालये सुरू करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. तेव्हा सर्व्हे करून आम्हाला कळवा आम्ही रुग्णालय सुरू करू. जे काही कारण नसताना रुग्णालय बंद ठेवत असतील, त्यांच्यावर कारवाई करा अशीही त्यांची भूमिका आहे. दरम्यान आजघडीला धारावी वगळले तर इतर कुठेही मुंबईत खागसी डॉक्टरांना पीपीई किट उपलब्ध करून दिला जात नाही. एन 95 मास्कही पुरेसे उपलब्ध नाहीत. तेव्हा या सुरक्षा साधनाशिवाय खासगी डॉक्टर कसे रुग्णसेवा देणार, अशी प्रतिक्रिया एका खासगी डॉक्टरने दिली आहे. तर, ही परिस्थिती लक्षात न घेता कारवाई होणार असेल तर मग त्याला विरोधही होणार असा इशाराही या डॉक्टरने दिला आहे.