'महाराष्ट्र दिन' हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा होतो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. परंतु आपल्याला हे राज्य सहजासहजी मिळालेले नाही. याकरिता १०५ आंदोलकांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली. या बलिदानापुढे नमते घेत अखेर तत्कालीन केंद्र सरकारने १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली आणि महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये अस्तितवात आली. जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास.
- महाराष्ट्र दिन : इतिहास -
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र मिळाले. त्यावेळी मुंबई राज्यात मराठी, गुजराती, कोंकणी आणि कच्छी असे विविध भाषिक नागरिक राहायचे. दरम्यान, १९५० च्या दशकात मराठी भाषिक लोकांसाठी वेगळ्या राज्याची मागणी पुढे येऊ लागली. त्यासाठी एक मोठे आंदोलन उभे राहिले. जे 'संयुक्त महाराष्ट्र आंदोलन' म्हणून ओळखले जाते. गुजराती भाषिक लोकांसाठी वेगळ्या राज्याची मागणीही याच दरम्यान सुरू झाली होती. राज्यांसाठी सुरू असलेला संघर्ष जवळजवळ १९६० पर्यंत सुरू होता. १९६० मध्ये संसदेने बॉम्बे रिऑर्गनाझेशन अॅक्ट पारित करत मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरात या दोन राज्याची निर्मिती केली. हा कायदा १ मे १९६० रोजी हा कायदा अस्तित्वात येऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
- 105 जणांनी दिले बलिदान -
राज्यांच्या पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी केंद्र शासनाने एस्. फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली २९ डिसेंबर १९५३ रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. या आयोगाने आपला अहवाल १० ऑक्टोबर १९५५ रोजी आपला अहवाल दिला. या अहवालात आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य केली होती. त्यामुळे फाजल अली आयोगाने दिलेल्या अहवालाविरोधात महाराष्ट्रभर असंतोष उसळला होता. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडण्यात आला. या त्रिराज्य योजनेत मुंबईला महाराष्ट्रापासून दूर ठेवल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. विशेषत: मुंबईत लोकांचा असंतोष वाढू लागला होता. १८ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबईतील विधानभवनासमोर या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला. सेनापती बापट यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यानंतर संप, बंद व मोर्चांचे सत्र सुरू झाले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधिक तीव्र झाली. तसेच १५ ते २२ जानेवारी दरम्यान झालेल्या संघर्षात ९० जणांचा मृत्यू झाला. एकंदरित संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या आंदोलनात एकूण १०५ जणांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली. तर १० हजार आंदोलकांना यावेळी ताब्यात घेण्यात आले होते.
- आंदोलनादरम्यान अनेकांनी बजावली महत्त्वाची भूमिका -
ब्रिटीशांच्या शासनकाळात, भारतात सुमारे 600पेक्षा जास्त संस्थाने आणि प्रांत अस्तित्वात होती. त्यावेळीही भाषा हा कळीचा मुद्दा होता. त्यामुळे भाषेच्या आधारे राज्यांची पुनर्रचना करण्याची मागणी स्वातंत्र्यानंतरच पुढे आली होती. स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेले आंदोलन हे सर्वात मोठे आंदोलन होते. हे आंदोलन जवळजवळ 5 वर्ष चालले. या आंदोलनात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसेच विविध राजकीय पक्ष वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला मराठी नागरिकांचा सक्रिय सहभाग होता. मुंबईचा महाराष्ट्रात झालेला समावेश हे या आंदोलनाचे यश होते. तसेच या आंदोलनात 'नवयुग', 'मराठा', 'संयुक्त महाराष्ट्र', 'पत्रिका', 'प्रभात', 'बेळगाव संवाद', 'नवल' आदी मराठी वृत्तपत्रांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजवाली होती.
- असा आहे 'महाराष्ट्र' या शब्दाचा उगम -
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये 'राष्ट्र' या नावाने संबोधले गेले आहे. सम्राट अशोकाच्या काळात 'राष्ट्रिक' आणि नंतर 'महा राष्ट्र' या नावाने ओळखले जाऊ लागले, असे ह्युएनत्संग या चीनी प्रवाशाच्या नोंदीवरून लक्षात येते. काहींच्या मते महारथी (रथ चालक) या नावाचा अपभ्रंश होऊन पुढे महाराष्ट्र झाले असेही म्हणतात. या संदर्भात अनेक मतमतांतरे आहेत.
- हिंदू राज्यांमध्ये विभागला होता महाराष्ट्र -
सद्याचे महाराष्ट्र राज्य सुरूवातीच्या काळात सातवाहन, वाकाटक, कलाकुरी, राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव अशा हिंदू राज्यांमध्ये विभागले होते.