गोरेगाव (मुंबई) - गोरेगावच्या हुक्का पार्लरमध्ये पोलिसांनी मारलेल्या छाप्यात सुमारे आठ कोटी रुपयांचा हुक्का फ्लेवर जप्त केला. 31 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांनी हुक्का पार्टीसाठी आणलेले हुक्का फ्लेवर्स जप्त करत मोठी कारवाई केली आहे.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कारवाई
दरवर्षी अनेकजण 31 डिसेंबर धांडगधिंगा करत साजरा करतात. या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्य आणि हुक्का वापरला जातो. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजेंस युनिट आणि समाजसेवा शाखेने संयुक्त कारवाईदरम्यान गोरेगाव येथील हुक्का पार्लरवर छापा टाकला. या कारवाईत सुमारे आठ कोटी रुपयांचे हुक्का फ्लेवर्स जप्त केले.
हेही वाचा - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी 'बार्क'च्या माजी सीईओला अटक
79 प्रकारचे साडेतीन टन हुक्का फ्लेवर्स जप्त
समाज सेवा शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी सांगितले की, सीआययू प्रभारी सचिन वाजे यांना माहिती मिळताच एक टीम तयार करून या ठिकाणीन छापा टाकण्यात आला. कारवाईत सुमारे साडेतीन टन हुक्का फ्लेवर्स जप्त केले. सुमारे दीड लाख लोक वापरू शकतील, इतक्या प्रमाणात हा हुक्का होता, असे पोलिसांनी सांगितले.
या छाप्यामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या 79 फ्लेवर्सचे हुक्का जप्त केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अनेकजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता किती जणांनी ऑर्डर दिली होती, कोण-कोण ग्राहक तेथे होते त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात हुक्का सापडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - दादर, माहीम, धारावीतील पेट्रोल पंप, ज्वेलरी कर्मचाऱ्यांच्या होणार कोरोना चाचण्या