मुंबई : प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ ही ‘वेब सिरीज’ २८ ऑगस्ट या दिवशी ‘एम् एक्स प्लेयर’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर प्रदर्शित होणार आहे. या ‘वेब सिरीज’चा अधिकृत ‘ट्रेलर’ प्रसारित झाला आहे. त्या ट्रेलरवरूनच आश्रम’ ही ‘वेब सिरीज’ केवळ हिंदू धर्माला अपकीर्त करणारी आहे. असे म्हणत हिंदू जनजागृती समितीने वेबसिरीजवर आक्षेप घेत बंदी घालण्याची मागणी गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.
वास्तविक प्राचीन काळापासून भारताच्या उत्थानामध्ये आश्रमव्यवस्थेने अतुलनीय योगदान दिले आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार प्रत्येक व्यक्ती ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमप्रक्रियेतून जाते. आश्रम या वेब सिरीजमध्ये ज्या आश्रमाचा उल्लेख केला आहे, ते ‘काशीपूर’ या गावातील असल्याचे सांगितले आहे. काशी हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या नावाशी साधर्म्य असणारे गावाचे नाव दाखवून हेतूतः हिंदूंच्या धार्मिक क्षेत्रांची प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. तसेच या वेब सिरीजमधील अभिनेता बॉबी देओल यांनी साकारलेली ‘बाबा निराला’ या नावाची मुख्य व्यक्तीरेखा व भक्ती की भ्रष्टाचार’, ‘आस्था की अपराध’ अशा स्वरूपाची वाक्ये घेतली आहेत. असे इतर आक्षेप हिंदू जनजागृती समितीने वेबसिरीजवर घेतले असल्याची माहिती मनोज खाडे, कोकण-पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक यांनी दिली आहे.
हिंदू जनजागृती समिती यांनी तीव्र शब्दांत निषेध करत, गृहमंत्री अनिल देशमुख यांना या वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी पत्र लिहित मागणी केली आहे. पत्रात त्यांनी, सध्याच्या ‘वेब सिरीज’ निर्मितीवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे, कलेच्या नावाखाली अश्लीलता, भडक हिंसा, हिंदू द्वेष, सैन्याचा अवमान, राष्ट्रद्रोह आदी मोठ्या प्रमाणावर दाखवले जाते. याला विरोध केल्याने नुकतेच केंद्र सरकारने सैन्यविषयक ‘वेब सिरीज’ बनवण्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे, असे निर्देश दिले होते. त्याच धर्तीवर ‘वेब सिरीज’च्या माध्यमातून होणारे हिंदू धर्म आणि श्रद्धास्थाने यांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’कडे (सेन्सॉर बोर्डाकडे) या सर्व वेब सिरीजचे नियंत्रण द्यावे, तसेच या मंडळामध्ये धार्मिक अधिकारी व्यक्तींची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच नुकतेच रझा अकादमी या धर्मांध संघटनेने ‘मुहंमद : द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्याच दिवशी तत्परतेने महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावर बंदी घालत केंद्र सरकारकडे बंदीची शिफारस करावी. सोबतच देवदेवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखणारा कायदा आणावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.