मुंबई : दिवसेंदिवस मुंबईत गुन्हेगारी व लुटमारीचे प्रमाण वाढत चालले आहे. गुजरातचे रहिवासी असलेले उमर अन्वंरभाई मेमन (31) या ज्वेलर्सची अमेरिकन व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. मेमन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मित्र श्याम शिंदे यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांना जावेद सय्यद याच्या वांद्रे येथील घरी बोलावले. त्यावेळी त्यांची नासीर शेखसोबत ओळख झाली. शेखने मेमन यांना व्हिसाचे काम करून देतो सांगताच, त्यांनी अमेरिकेचा मिनिस्ट्रि व्हिसा काढायचा असल्याबाबत त्याला सांगितले. त्याने, 44 लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. त्यानुसार, 5 नोव्हेंबर 2022 ते 7 डिसेंबर 2022 दरम्यान 31 लाख 28 हजार रुपये त्यांना पाठवले.
अमित शाह यांच्या नावाचा वापर : आठवडाभराने वांद्रे येथे शेख व त्याचा भाऊ मुन्नाभाईजवळ उर्वरित 12 लाख 72 हजार रुपयांची रक्कम दिली. मात्र, बरेच दिवस उलटूनही काम होत नसल्याने त्यांनी 25 डिसेंबरला नासिरकडे चौकशी केली. त्याने, काम झाले नसून पैसे परत देतो सांगून एक महिन्याचा वेळ मागितला. तसेच, याचा पुरावा म्हणून कोर्टाकडून बॉण्ड लिहून त्यामध्ये आतापर्यंत 44 लाख रुपये दिल्याचे नमूद केले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी नासिर शेख, मुन्ना शेख आणि जैदी सय्यद विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत आरोपींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचाही वापर करत पैसे लुबाडण्यात आले होते.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा : त्यानंतर काही दिवसांनी त्याने जैदी सय्यद नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. त्याने तो अमित शहा यांच्या शिष्टमंडळाचे मंत्रालयातून मिनीस्ट्री व्हिसाचे काम फेब्रुवारीपर्यंत करून 7 देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानेही काम केले नाही. पुढे, दोघांकडे पैसे परत मागताचा तगादा लावल्यावर त्यांनी शिवीगाळ केली. तसेच, पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अखेर, त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नासिर, मुन्नाभाई आणि जैदीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न : 16 मार्चला जैदी आणि शेख यांनी मेमन यांना वांद्रे परिसरात बोलावून घेतले. तेथेही पैसे न देता मेमन यांना शिवीगाळ केली. याच तणावातून 18 मार्चला त्यांनी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत शिंदे आणि सय्यदला कॉल करून त्यांनी सांगितले. शिंदे व सय्यद यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे वेळीच दाखल केल्यामुळे मेमन थोडक्यात वाचले. वांद्रे पोलीस या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहेत.