मुंबई - एका गुन्ह्याच्या संदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या महिला आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला आरोपी रेल्वेखाली येत असल्याचे लक्षात येताच पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महिला आरोपीचा जीव वाचवल्याची घटना समोर आलेली आहे. शुक्रवारी (28 मे) रोजी ही घटना घडली असून दादर रेल्वे फलाटावर लावण्यात आलेला सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
दादर, भायखळा, सीएसएमटी सारख्या रेल्वे स्थानकांमध्ये फेरीवाल्यांकडून बळजबरी हप्ता वसुली करणाऱ्या आरोपीच्या विरोधात जीआरपी पोलिसांकडे संतोष राम प्रताप सिंह उर्फ बबलू ठाकुर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. बबलू ठाकूर याने खंडणीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशाचा वापर संपत्ती विकत घेण्यासाठी केला होता. या बरोबरच खंडणीच्या माध्यमातून मिळालेली संपत्ती ही त्याची पत्नी रिटा सिंह हिच्या नावावर करून ठेवली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी रिटा सिंह ही फरार असल्यामुळे पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. दरम्यान, नवी मुंबईत रिटा लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नवी मुंबई येथून तीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला पुन्हा दादर रेल्वे पोलीस ठाणे येथे आणत असताना रेल्वे फलाट क्रमांक 4 वरून या महिलेने उडी मारून विरुद्ध दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिचा पाठलाग करून तिला पुन्हा अटक केली आहे. दरम्यान, या महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न करताना रेल्वे फलाटावर टिटवाळा येथे जाणारी लोकल रेल्वे आली होती. मात्र, हा प्रसंग घडत असताना लोकल रेल्वेच्या मोटरमनने तत्काळ ब्रेक लावून लोकल थांबवली असता ही महिला लोकलखाली येता-येता वाचली आहे.
दरम्यान, या महिलेचा पाठलाग करत असताना पोलीस निरीक्षक के.डी. घनवट या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला व हाताला दुखापत झाली आहे. तर पळून जाणाऱ्या आरोपी महिलेला किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी धोरण निश्चित करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश