मुंबई - राज्यातील कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या घोषणेला आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेत अशा प्रकारे परीक्षा रद्द करता येत नाहीत, त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसारच निर्णय घ्या, अशा सूचना दिल्या आहेत.
राज्यपालांनी आज (मंगळवारी) मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सूचनांमुळे राज्यातील तब्बल ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा अंतिम परीक्षेच्या संदर्भात चिंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसऱ्याच दिवशी भाजपचे नेते ॲड. आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना एक पत्र देवून एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनेल, असा इशारा दिला होता. त्यामुळे आज राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशा प्रकारे निर्णय घेता येत नाही, त्यासाठी कायदेशीर बाबी तपासून घेतल्या पाहिजे अशी सूचना केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात लिहिले आहे, की अंतिम वर्षाच्या परिक्षावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असते. या परीक्षांच्या आधारावरच त्यांना कोणत्या नोकऱ्या मिळतील आणि नोकरीमध्ये कोणते पद मिळेल हे ठरते. सीबीएसई आपल्या परीक्षा घेऊ शकतात तर विद्यापीठ आपल्या परीक्षा का घेऊ शकत नाही, असा सवाल राज्यपालांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांच्या या नव्या सूचनांमुळे राज्य सरकार यामध्ये येत्या काळात संबंध ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपण अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, भाजपप्रणित अभाविपचा संघटनेने व भाजपनेही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची माणगी राज्यपालांकडे लावून धरून मुख्यमंत्र्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसून येते.