मुंबई - उत्तर मुंबईचे खासदार आणि भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी सकाळपासूनच चौक सभा घेऊन भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. त्यांनी आज दुपारी मागाठाणे येथे रिक्षाचालक संघटनेची सभा आयोजित करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना उमेदवारांच्या प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांची सकाळपासूनच लगबग सुरू आहे. शेट्टींच्या प्रचारासाठी मागाठाणे येथे आज दुपारी रिक्षाचालक संघटनेची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शेकडोहून अधिक रिक्षाचालकांनी शेट्टींना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी शेट्टींनी रिक्षाचालकांची भेट घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या रिक्षाचालक संघटनेच्या सभेच्या ठिकाणी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी देखील भेट दिली. शेट्टींनी गेल्या ५ वर्षांत केलेली कामे पाहता ते पुन्हा भरघोस मतांनी विजयी होऊन दिल्ली दरबारी जातील, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.