मुंबई - एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत कार्ड बदलून फसवून करणाऱ्या अट्टल चोराला जेरबंद करण्यात घाटकोपर पोलिसांना यश आले आहे. तुफेल अहमद लालमिया सिद्दीकी (33) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 109 डेबिट कार्ड, 1 लॅपटॉप, 1 चारचाकी व 1 मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे.
तुफेल अहमद लालमिया सिद्धीकी हा आरोपी उच्च शिक्षित असून फायनान्स कंपनीत तो नोकरीला होता. महिना 80 हजार वेतन घेऊन सुखी जीवन जगत असणाऱ्या तुफेल ची 2018पूर्वी नोकरी सुटली होती. काम धंदा नसल्याने त्याने सुरुवातीला एटीएम सेंटरमध्ये एका व्यक्तीला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने डेबिट्स कार्ड बदलून स्वतः कडील बनावट कार्ड देत फसवणूक सुरू केली. यानंतर तो हे गुन्हे करू लागला. तुफेल याला 2018मध्ये अटक देखील झाली होती.
तुफेलने तब्बल 109 डेबिट कार्डद्वारे हातचलाखी करून त्यांचे पासवर्ड मिळवत विविध एटीएममधून पैसे उकळले. दिवसाला एका एटीएममधून आरोपीने 20 ते 25 हजार काढल्याचे निष्पन्नात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपीवर घाटकोपर पोलीस ठाण्यात 5 गुन्हे , पंतनगर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे , साकीनाका पोलीस ठाण्यात 1 तर माहीम पोलीस ठाण्यात 1 असे विविध गुन्हे दाखल आहेत.
तुफेल सिद्दीकीकडून जप्त केलेल्या 109 डेबिट्स कार्ड्स बाबत अधिक तपास चालू आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे घाटकोपर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन पाटील यांनी सांगितले. एटीएम सेंटरमध्ये जाताना ग्राहकांनी एटीएमबाबत माहीत नसेल तर सेंटरमध्ये एकटे न जाता आपल्या विश्वासू व्यक्तीला सोबत न्यावे आणि कार्डबाबत माहिती घ्यावी. ज्यांचे एटीएममध्ये पैसे चोरीला गेलेत वा एटीएमबाबत फसवणूक झाली असल्यास त्यांनी घाटकोपर पोलिसांना कळवावे, असे आवाहन मदन पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा-विसरवाडीत बनावट ऑईल कारखान्याला भीषण आग, ५ घरे जळून खाक