मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडकून पडलेल्या पर राज्यातील कामगार, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांच्या मदतीसाठी घाटकोपरच्या नगरसेविका राखी जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. घाटकोपरच्या शिवाजी टेक्निकल शाळेसमोरील समाज मंदिर येथील कम्युनिटी क्लिनीकमध्ये त्यांचे गावी जाण्यासाठी असलेले अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
कम्युनिटी क्लिनीकनंतर रोज दुपारी २ ते सायंकाळी ६ यावेळेत ही सुविधा उपलब्ध असेल. गरजू नागरिकांना आम्ही एक अर्ज देणार आहोत. या अर्जात त्यांची संपूर्ण माहिती नागरिकांना भरावी लागेल. संपूर्ण भरलेला अर्ज पंतनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानतंर हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. आजपासून ही सुविधा सुरू करण्यात आली. आपल्या गावी जाण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांनी अर्ज भरून देण्यास सुरुवात केली आहे. अर्ज कसा भरायचा? एका अर्जावर किती जणांची नावे देता येतील. अर्जासोबत आपण आपली विश्वसनीय माहिती अर्जात अर्जदाराला भरावी लागणार आहे, याबाबत जाधव यांनी सविस्तर माहिती दिली आहे.