मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास हस्तक असलेल्या मृत इक्बाल मिरचीच्या मुंबईतील संपत्तीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्तीची कारवाई केली आहे. वरळी परिसरात असलेल्या रबिया मेंशन, मरिमा लॉज, सी व्यु या संपत्तीचा त्यात समावेश आहे.
ट्रस्ट ने सादर केले होते बनावट कागदपत्रे -
ईडीच्या कारवाईदरम्यान 2005 मध्ये इक्बाल मिरची याची वरळी परिसरातील ही असलेली संपत्ती समोर आल्यानंतर यासंदर्भात जप्तीची कारवाई केली जात होती. मात्र, याविरोधात सर मोहमद युसूफ ट्रस्टकडून विरोध दर्शवण्यात आलेला होता. ही संपत्ती इक्बाल मिरचीकडून पैसे न मिळाल्यामुळे आपल्याच ताब्यात असल्याचा दावा या ट्रस्टने केला होता. तर न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने ट्रस्टच्या बाजूने निकाल देत ही संपत्तीही ट्रस्टकडे राहिल, असे म्हटले होते.
हेही वाचा - सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) संचालक एस. के मिश्रा यांना वर्षाची मुदतवाढ
मात्र, नोव्हेंबर 2019मध्ये ईडीकडून आणखी एका कारवाईत सदरच्या संपत्तीच्या व्यवहाराचे पुरावे हाती लागल्यामुळे इक्बाल मिरची याने सदर ट्रस्टला या संपत्तीचा पूर्ण रक्कम देऊन टाकली असल्याचे समोर आले होते. या बरोबरच या संपत्तीचा ताबा पत्रसुद्धा ट्रस्टकडून इक्बाल मिर्ची याला देण्यात आल्याचेही समोर आले. या संदर्भातील बँक पासबुक, ट्रस्टकडून इक्बाल मिरची याला जारी करण्यात आलेले संपत्तीचे ताबा पत्र, आयकर भरणा संदर्भातील इतर कागदपत्रे ईडीला मिळाल्यामुळे ही संपत्ती इक्बाल मिरचीच्या नावावर असल्याचे सिद्ध झाले होते.
798 कोटींची संपत्ती -
2005मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टकडून ही संपत्ती स्वतःचीच असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, आता या प्रकरणातील पूर्ण कागदपत्रे समोर आल्यामुळे ईडीकडून या संपत्तीचा ताबा घेण्यात आला आहे. तब्बल 798 कोटी रुपयांची ही संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. या संपत्तीच्या संदर्भात इक्बाल मिरची, त्याची दोन मुले आसिफ मेमन व जुनेद मेमन, हाजरा मेमन यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. तसेच यासंदर्भात ईडीकडून आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.