मुंबई : भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवानंतर माघ महिन्यातील गणेश जयंतीचे गणेश भक्तांना वेघ लागते. यानिमित्ताने मूर्तीकारांनी देखील त्यांच्या कलाकारीद्वारी मूर्तींची निर्मिती करायला सुरूवात केली आहे. माघ गणेश जयंतीनिमित्त गणेशमूर्तींचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
दोन वर्षांनी पुन्हा बाप्पांची धामधूम : सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पा यांचा माघ गणेशोत्सव अर्थात गणेश जयंती २५ जानेवारी रोजी असून त्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मुंबईतील विविध कारखान्यांमध्ये मूर्तिकार गणरायांच्या मूर्तीला अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. विविध रूपातील गणपती बाप्पांच्या मुर्त्या इथे कारखान्यात दिसत आहेत. वास्तविक माघ महिन्यात घराघरात गणपती बाप्पा विराजमान करण्याचं प्रमाण दरवर्षी वाढत आहे. या कारणास्तव गणपती बाप्पाच्या विविध रूपांतील छोट्या व सुंदर मूर्त्या भक्तांचे आकर्षण बनत आहेत. भक्तांच्या इच्छे नुसार गणपती बाप्पा विघ्नहर्तानेच करोनाच सावट पूर्णतः दूर केल्याने दोन वर्षानंतर हा उत्सव आता पुन्हा एकदा धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यासाठी मूर्ती कारखान्यांपासून ते बाजारपेठापर्यंत तयारी पूर्ण झालेली आहे.
भक्तांमध्ये उत्साह : २५ जानेवारीला गणपती बाप्पाच आगमन होत असून २६ जानेवारीला गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. विशेष करून गणेश चतुर्थी अर्थात भाद्रपद महिन्यामध्ये अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन होते. त्याचबरोबर सार्वजनिक गणपती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विराजमान केले जातात. त्या कारणास्तव बऱ्याच लोकांना, भाविकांना अनेक ठिकाणी बाप्पासाठी भेटीगाठी द्यायच्या असल्याने त्यांना इच्छा असूनही आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान करता येत नाहीत. परंतु आत्ता माघ महिन्यांमध्ये अनेक भक्तगण गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान करत असतात. यामध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या महिन्यात तशी भक्तगणांना थोडी सवड सुद्धा असते. फक्त दोनच दिवस गणपती बाप्पांचा घरात पाहुणचार होणार असल्याने अनेक भक्तगण भक्ती भावाने पूजा अर्चा करत असतात. त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब यामध्ये मग्न झालेलं दिसून येतं.
बाप्पांसाठी सर्वकाही : माघ गणेश जयंती विषयी बोलताना मूर्तिकार, राजेश हजारे सांगतात की, अनेक भक्तगण या दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान करतात. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे चालू असलेली ही परंपरा असून दरवर्षी यामध्ये अधिकाधिक भर होताना दिसत आहे. राजेश हजारे हे सुद्धा अनेक वर्षांपासून मूर्ती साकारण्याचे काम करतात. परंतु यामध्ये ते हा एक व्यवसाय म्हणून न बघता विशेष करून भक्तगणांची आवड व हजारे यांची मूर्ती साकारण्याची इच्छा याकडे ते जास्त भर देताना दिसतात. यंदा सर्व क्षेत्रात महागाईने उच्चांक गाठलेला असताना मूर्त्यांच्या किमतीही वाढलेल्या आहेत. परंतु भक्तगण सुद्धा जास्त आढे वेढे न घेता मूर्तीचा योग्य तो मोबदला द्यायला तयार असतात. शेवटी विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान होणार आहे, हीच त्यांच्यासाठी फार मोठी आनंदाची बाब असल्याचे हजारे सांगतात.
गणेश जयंतीनिमित्ताने हे योग : गणेश जयंती निमित्ताने तीन योग होत आहेत. परिघ योग सकाळपासूनच असेल, जो संध्याकाळी ६:१६ पर्यंत असेल. त्यानंतर शिवयोग सुरु होईल. या दिवशी रवी योग सकाळी ०७:१३ ते रात्री ०८:०५ पर्यंत असेल. तर भाद्र आणि पंचक देखील गणेश जयंतीला असतात भाद्र आणि पंचक देखील आहे. २५ जानेवारी रोजी पंचक संपूर्ण दिवस आहे आणि भाद्रा सकाळी ०७:१३ ते दुपारी १२:३४ पर्यंत आहे.
हेही वाचा : Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या लोकांना कुटूंबामधुन मिळेल आनंदाची बातमी, वाचा, उद्याचे राशीभविष्य