मुंबई Blind Artists Music Show : कलावंताला जात, धर्म, पंथ नसतो असं म्हणतात. त्याचप्रमाणं कलावंत हा शरीरयष्टीने सुदृढ असला पाहिजे, असाही दंडक नसतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या मुंबईत गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी स्वरलहरी या अंध कलावंतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतंय. मुंबईतील आठ अंध कलावंतांनी एकत्र येऊन 'स्वरलहरी' हा हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम तयार केलाय. या वाद्य वृंदावतील सर्वच कलावंत हे अंध आहेत. यात वादक, कलावंत आणि गायक आहेत.
पंधरा वर्षांपासून संगीताची सेवा : मुंबई विविध ठिकाणी राहणाऱ्या या आठ कलावंतांनी एकत्र येऊन 2007 मध्ये स्वरलहरी या कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते कार्यक्रम आणि प्रसंगानुसार गाण्यांची रचना करीत सादर करतात. अंध कलावंतांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांना मदत व्हावी, यादृष्टीनं कित्येक सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून त्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या कलावंतांची संगीताबद्दल असलेली आवड आणि त्यांच्या गायनामुळं प्रभावित होऊन त्यांना विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलावण्यात येतं, अशी माहिती या स्वरलहरी कार्यक्रमाच्या संयोजिका मुक्ता कोठारी यांनी दिलीय. (blind artists music show in Ganeshotsav)
काही कलावंत हे संगीताचे शिक्षक म्हणून शाळा अथवा खासगी शिकवणी करतात. मात्र, काही कलावंत हे केवळ या कार्यक्रमाच्या आधारेच आपली उपजीविका करतात-स्वरलहरी कार्यक्रमाच्या संयोजिका मुक्ता कोठारी
कोरोनानंतर कार्यक्रमात अडचणी : कोरोना महामारीपूर्वी स्वरलहरी कार्यक्रमाला दर महिन्याला किमान चार ते पाच ठिकाणाहून कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात येत होतं. मात्र, कोरोना कालावधीत खंड पडल्यानंतर आता ही संख्या कमी झालीय. त्यामुळं ज्या कलावंतांना कोणताही पूरक उद्योग अथवा नोकरी नाही. अशा अंध कलावंतांवर दैनंदिन मिळकतीचा प्रश्न उभा राहिलाय, असं कोठारी सांगतात. या आठ कलावंतांपैकी चार हे गायक कलावंत आहेत. तर इतर चार कलावंतांपैकी एक कलावंत ढोलकी वाजवतो, दुसरा मेंडेलिन वाजवतो, तिसरा ऑर्गन वाजवतो, तर चौथा ऑक्टोपॅड हे वाद्य वाजवतो. कलावंतांचा आवाज आणि कार्यक्रमाविषयी असलेली त्यांची तळमळ पाहता त्यांना विविध ठिकाणाहून बोलावणं येतं. सध्या मुंबईच्या गणेशोत्सवात या स्वरलहरी कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी अधिक मदत मिळावी, अशी अपेक्षा या कलावंतांकडून व्यक्त करण्यात येतेय.
हेही वाचा :
- Indian Women Blind Cricket : भारतीय महिला अंध क्रिकेट संघानं वर्ल्ड गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक, पंतप्रधानांकडून कौतुक
- Mumbai News: आपल्या बासरीच्या स्वरांनी मुंबईकरांना खिळवून ठेवणारा कलाकार, इरशाद शेख
- Blind cricket world cup : पाकिस्तानच्या 'या' 34 खेळाडूला मिळाला व्हिसा, भारतात होणाऱ्या विश्वचषकात 'हे' संघ होणार सहभागी