मुंबई- जगात देशात आणि राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकराने कोरोना तपासणीसाठी नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोना तपासणी शुल्कात जवळपास 40 टक्क्यांची कपात केली आहे. याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी मंगळवार (8 सप्टेंबर) पासून होणार असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कोरोना चाचणीचे दर नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा साथरोग अधिनियमाअंतर्गत हा आदेश जारी केला आहे. कोविड केंद्रावर घेण्यात येणाऱ्या स्वॅबच्या तपासणीसाठी यापुढे 1900 रुपयांऐवजी 1200 रुपये घेण्यात येतील. रुग्णालये, पॅथलॉजिकल लॅब या ठिकाणी हे दर 2200 रुपयांहून 1600 रुपये करण्यात आले आहेत. रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेणे असेल तर त्यासाठीचे शुल्क हे 2500 रुपयांहून 2000 झाले आहे. या शुल्कामध्ये पीपीए किट, आरटीपीसीआर किट, रिपोर्ट कळविणे या सर्वांचा समावेश आहे. या पेक्षा जास्त शूल्क कोणाला घेता येणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
राज्यभरातून रुग्णांच्या तक्रारी वाढत असल्याने कोविड रुग्ण तसेच नॉन कोविड रुग्णांनाही उपचार मिळणे आवश्यक आहे. नॉन कॉविड रुग्णांना कोणत्याही रुग्णालयांनी उपचार नाकारु नयेत .रुग्णालयांनी आवश्यक ती काळजी घेऊन तात्काळ उपचार करण्याची दक्षता घ्यावी. सर्व रुग्णालयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.