मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. शिवाजी पार्क येथील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 75 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.
अनघा मनोहर जोशी यांच माहेरचे नाव मंगल हिगवे. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला. मनोहर जोशी यांच्याशी 14 मे 1964 रोजी अनघा यांचा विवाह झाला. अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे. मनोहर जोशी यांच्यामागे त्या सावलीसारख्या खंबीर उभ्या होत्या. मनोहर जोशी यांच्या व्यवसायातले चढउतार, राजकीय व सामाजिक जीवनातले यश यात अनघा जोशी यांची मोलाची साथ राहिली. मनोहर जोशी यांची राजकारणातील कारकीर्द लग्नानंतरच सुरु झाली. 1968 मध्ये ते सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली.