मुंबई - भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या, देवी रुपातील स्त्रीशक्तीचे दररोज पूजन होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची उद्यापासून सुरुवात होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोविड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन होईल. यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने व शक्यतो घरीच साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत, नागरिकांनी, देवीभक्तांनी उत्सवकाळात स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा उत्सव असल्याचे म्हणाले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीदुर्गामाता, श्रीअंबामाता, श्रीरेणुकामाता, श्रीलक्ष्मी, श्रीसरस्वती आदी रुपातील स्त्रीशक्तीचे पूजन करताना आपल्या कुटुंबातील, गावातील, शहरातील, समाजातील माता-भगिनींचाही सन्मान वाढवण्याचे काम झाले पाहिजे. माता-भगिनींना त्यांचा हक्क, न्याय, सन्मान मिळेल. त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही असा संकल्प आजच्या घटस्थापनेच्या निमित्ताने करुया असेही शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.