मुंबई - शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, रुग्णांसाठी बेडची कमतरता भासू लागली आहे. यामुळे मुंबईत ५ हजार खाटांचे साथ रोग नियंत्रण रुग्णालय उभारले जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार भांडुप किंवा मुलुंड येथील जागा या रुग्णालयासाठी निश्चित केली जाणार आहे.
मुंबईत मार्चपासून आतापर्यंत मागील सहा महिन्यात १ लाख ७३ हजार ५३४ रुग्ण आढळून आले असून यात ९ हजार २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत साथीच्या रोगांवर उपचार करणारे कस्तुरबा हे एकमेव रुग्णालय आहे. मुंबईमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता खासगी रुग्णालये तसेच पालिकेची रुग्णालये कमी पडत आहेत. पालिकेला खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात घ्याव्या लागल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे, त्याही कमी पडल्यानंतर जम्बो सेंटर उभारावी लागली आहेत.
आता पालिकेला साथीच्या आजारावर उपचार करणारे रुग्णालय असावे, याची जाणीव झाली आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पालिकेने एकाच ठिकाणी २० एकर जागा मिळेल, असे भूखंड पाहण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशी जागा ज्यांच्याकडे आहे, अशा लोकांकडून पालिकेने निविदा मागवल्या आहेत. त्यानुसार भांडुप आणि मुलुंड या ठिकाणी दोन भूखंड देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. यापैकी कोणत्या भूखंडावर रुग्णालय उभे राहील, हे अद्याप ठरलेले नाही.
साथ रोग नियंत्रण रुग्णालय ५ हजार बेडचे असणार आहे. त्यासाठी पालिकेला २० एकरचा भूखंड हवा होता. मुंबई शहर आणि उपनगरातून नागरिकांना या रुग्णालयात सहज पोहचता यावे, म्हणून वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या जवळ हा भूखंड असावा व भूखंडाजवळ जाण्यासाठी ९० फुटांचा रस्ता असावा, अशा अटी निविदेत होत्या. त्याप्रमाणे पालिकेला भांडुप आणि मुलुंड याठिकाणी दोन भूखंड देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. लवकरच यापैकी एक भूखंड रुग्णालयासाठी निश्चित केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - वीजबील प्रश्नी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय, फडणवीसांसोबत मराठा आरक्षणावर चर्चा करणार मुख्यमंत्री
हेही वाचा - पुनर्विकास घोटाळा प्रकरण : सारंग वाधवानला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक