मुंबई - अवघे जग एका बाजूला कोरोना या विषाणूशी जगण्याचा संघर्ष करत असताना महाराष्ट्रात 12 हजार हेक्टरवरील टोमॅटो शेती संशयित विषाणूच्या संकटात सापडली आहे. शेकडो शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर कृषिमंत्र्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विश्वनाथा यांना संपर्क केला. परंतु, कुलगुरूंनी या विषाणूचे नमुने प्रयोगशाळेत पाठवल्याचे सांगितले. प्रत्यक्षात आज 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने कुलगुरू डॉ. विश्वनाथ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॉकडाऊनमुळे संशयित विषाणूचे नमुने पुण्यातील कुरिअर कंपनीत अडकल्याचे कबूल केले. 12000 हेक्टरवरील टोमॅटो आणि कोट्यावधीची उलाढाल असलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संकटात असताना शासन आणि कृषी विद्यापीठांमध्ये असमन्वयामुळे शेतकरी उद्विग्न झाले आहेत.
![problem of new virus impact on tomato](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-tomato-virus-mumbai-7204684_09052020155259_0905f_1589019779_844.jpg)
संशयित विषाणुजन्य रोगाची लक्षणे ToBRF (Tomato Brown Rugose Fruit Virus) सारखी आहेत पण 100 टक्के खात्री नाही. या रोगाने युरोपियन देशात खूप धुमाकूळ घातला आहे. या रोगग्रस्त पिकांचे सॅम्पल प्रयोगशाळेत नेऊन तपासणे खूप गरजेचे आहे. परंतु नेहमीप्रमाणे शासकीय यंत्रणा ढिम्म आहेत. विद्यापीठांच्या पथकाने संगमनेर भागात पाहणी केली.रोगाच्या नावासहित कुठलीही ठोस उपाययोजना तेही सुचवू शकले नाहीत. खरेतर या रोगाचे सॅम्पल घेऊन लॅबमध्ये त्याची टेस्ट करून हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे किंवा आणखी कोणत्या प्रकारचा रोग आहे त्याच सोबत त्याची कारणे शोधणे खूप गरजेचे आहे, असे कृषी कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर अंकुश चोरमुले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
![problem of new virus impact on tomato](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-tomato-virus-mumbai-7204684_09052020155259_0905f_1589019779_512.jpg)
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक शेतकरी भलत्याच समस्येने ग्रासलेले आहेत. ऐन भरात आलेले प्लॉट अकाली पिवळे पडून जात आहेत. फळे हिरवी असतानाच पिवळी पडत असल्यामुळे मार्केटमध्ये अशा मालाला उठाव नाही. ही फळे शेतातून तोडून बाहेर फेकून द्यावी लागत आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव सर्वच टोमॅटोच्या जातीवर दिसून येत असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सातारा, संगमनेर, नारायणगाव या भागात या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शेतकरी नारायण घुले यांनी संगमनेरहून गेल्या महिन्यात अशी लक्षणे दिसणारे फोटो शेअर केले होते. त्यानंतर कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाने पथक पाठवून तपासणी केली परंतु त्यांनी थातुरमातुर उपाय सुचवल्याशिवाय काहीच कारवाई केली नसल्याचे समजते.
फ्रान्सच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फिनिस्टरमध्ये टोमॅटोच्या झाडांवर एक घातक विषाणू संक्रमित झाला आहे. या संक्रमणामुळे पूर्ण शेत उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाने सांगितलं की, या घातक विषाणूच्या संक्रमणावर कोणाताही उपचार नाही, त्यामुळे टोमॅटोच्या शेतीला पूर्णपणे वेगळे करण्यात आले आहे. तसेच टोमॅटो असलेले ग्रीनहाऊसही नष्ट केले जाणार आहेत. या विषाणूची लागण झाल्यानंतर टोमॅटो खाण्यालायक राहत नाही आणि त्यांच्यावर डाग पडतात. या विषाणूचा माणसांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र, टोमॅटोच्या झाडांना विषाणूची लागण झाल्याने टोमॅटोची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
फ्रान्सप्रमाणेच इटली आणि स्पेनमध्येही टोमॅटोच्या झाडांना या विषाणूची लागण झाली आहे. युरोपियन युनियनमध्ये स्पेन आणि इटली टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेणारे देश आहेत. मात्र, या ठिकाणीदेखील टोमॅटोंना विषाणूची लागण झाल्याने पिके नष्ट केली जात आहेत. युरोप आणि अमेरिकामध्ये पसरण्यापूर्वी या घातक विषाणूबाबत सर्वात आधी 2014 साली इज्राइलमध्ये माहिती झाली होती. मात्र जुलै 2018 साली ब्रिटनमध्ये या विषाणूचे पहिले प्रकरण समोर आले होते. त्यानंतर टोमॅटोची बियाणे आणि झाडांची चाचणी आणि निरीक्षण केले जाईल, असे फ्रान्सने फेब्रुवारीच्या सुरुवातीला म्हटले होते. तरीदेखील फ्रान्समध्ये या घातक विषाणूने आपले हातपाय पसरलेच.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे दाखले देऊन कृषी मंत्री दादा भुसे यांना याबाबत तातडीने हस्तक्षेप करून ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून विषाणूजन्य झाडांचे नमुने तातडीने बंगलोरच्या प्रयोगशाळेत पाठवावे अशी विनंती करण्यात आली. परंतु, सध्या मालेगाव मुक्कामी असलेल्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी वारंवार प्रयत्न करुनही ईटीवी भारतच्या प्रतिनिधीला याबाबत उत्तर दिले नाही.
विषाणूंचा प्रादुर्भाव निश्चित झाला तर एक मोठी बहुराष्ट्रीय बियाणे उत्पादक कंपनी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषाणू बाबत गुप्तता पाळली जात असून तपासणी प्रयोगशाळेच्या सोयीचा त्रोटक अहवाल देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,अशी सूत्रांची माहिती आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विश्वनाथा यांनी तर कोरोना हा विषाणू चीनमध्ये मानवनिर्मित असल्याचा अजब दावा केला. टोमॅटोचा विषाणू आणि कोरोनाची तुलनाच होऊ शकत नाही. सध्या बाजारात लॉक डाऊन मुळे टोमॅटोचे दर उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी फवारणीसाठी टाळाटाळ करत आहे त्यातूनच टोमेटो बागांचे नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
विषाणूग्रस्त टोमॅटो रोपांचे नमुने बंगलोरच्या प्रयोगशाळेत का पाठवले जात नाही? याबाबत सोईस्कर मौन बाळगत त्यांनी मी स्वतः प्रयोगशाळेच्या संचालकांशी दूरध्वनीवरून बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीतच विद्यापीठ आणि शासनामध्ये सवेंदनशीलता नसल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी भरडून निघत आहे. कोरोनाच्या बाबतीत जी दिरंगाई झाली तिच टोमॅटो विषाणू बाबतीत झाली तर आधी कोरोनाने व्यथित असलेली संपूर्ण टोमॅटो वर अबवलंबून असणारी अर्थव्यवस्था आणि टोमेटो उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.