मुंबई - बदली कामगारांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत शहरामधील प्रमुख सरकारी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी मंगळवार सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने रूग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या काम बंद आंदोलनात सकाळी दहा वाजल्यापासून जे. जे. रुग्णालय, कामा रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे या रुग्णालयातील सर्व कामकाजावर त्याचे परिणाम होत असून अनेक रुग्णांना उपचारासाठी सुविधा मिळत नसल्याचे दिसून आले. मागील अनेक वर्षापासून आमच्या बदली कामगारांचा प्रश्नाकडे सरकार लक्ष्य देत नाही. तसेच, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेचे शरद रेनॉसे यांनी केली. सध्या या रुग्णालयात ६०० रुग्णाच्या मागे १ चतुर्थ कर्मचारी, अशी अवस्था आहे. त्यामुळे आमच्यावर कामाचा प्रचंड ताण असल्याने रिक्त जागा तत्काळ भराव्यात, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
दुपारी जे. जे. रुग्णालय वगळता बाकी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. जे.जे रुग्णालय मुंबईतील सर्वात मोठं सरकारी रुग्णालय आहे. गेल्या काही वर्षात या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीये. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना याचा मनस्ताप सोसावा लागत आहे.