मुंबई : "50 खोके एकदम ओके" ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shine ) गटाची डोकेदुखी झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने सभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून शिंदे गटाच्या आमदारांवर व मंत्र्यांवर पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. आता हे आरोप करणाऱ्या नेत्यांविरोधात कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा एकनाथ शिंदे गटाकडून देण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात नोटीस - "50 खोके, एकदम ओके" ही राजकीय घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच गाजली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडून ते सरकार सत्तेच्या खाली खेचले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाशी युती करत राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन केले. मात्र हे 40 आमदार शिवसेनेचे गद्दारी करून बाहेर पडले, या सर्व आमदारांना 50 खोक्यांचे अमिष देण्यात आले, असा आरोप महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपामुळे सत्ताधारी पक्षातील एकनाथ शिंदे गटाने या आरोपांबाबत आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.
अधिवेशनात पहिल्यांदाच पन्नास खोक्याची घोषणा - महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने घोषणाबाजी केली होती. यावेळी '50 खोके, एकदम ओके,' अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी दिल्या होत्या. विरोधी पक्षाच्या बहुतेक आमदारांच्या हातात '50 खोके, एकदम ओके' अशा घोषणांचे फलक ही पाहायला मिळाले होते. तेव्हापासून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत पन्नास खोके एकदम ओके ही राजकीय घोषणा केलेली पाहायला मिळाली.
सोशल मीडियावर घोषणेचा बोलबाला - सोशल मीडियाचा विस्तार अफाट आहे. त्यामुळे पन्नास खोके एकदम ओके, अशी घोषणा विरोधी पक्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली. या घोषणेवर अनेक मिम्स देखील तयार झाले. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान "50 खोके, एकदम ओके" ही घोषणा दिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली. प्रत्येक गावाच्या चौकात, पान टपरीवर, जिथे जिथे चार लोक एकत्र येऊन चर्चा करतात अशा सर्व ठिकाणी या घोषणांची चर्चा सुरू झाली होती. तसेच "पन्नास खोके, एकदम ओके" ही घोषणा सोशल मीडियावर देखील तेवढीच वायरल झाली आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच नागरिकांच्या तोंडामध्ये "50 खोके, एकदम ओके" अशा घोषणा पाहायला मिळाल्या. या घोषणा नागरिकांनी अगदी सणांच्या माध्यमातून देखील या घोषणांचा वापर केला.
लग्न सोहळ्यात 50 खोक्यांचा टोमणा - बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना सातत्याने पन्नास खोके एकदम ओके किंवा 50 खोके घेणारे आमदार, असे टोमणे सार्वजनिक ठिकाणी मारले जात असल्याची ग्वाही खुद्द आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. आपण स्वतः एखाद्या कार्यक्रम किंवा लग्नसोहळ्यात गेलो तर 50 खोके घेणारा आमदार अशी टीका आपल्यावर केली जाते असे प्रसारमाध्यमांसमोर बच्चू कडू यांनी सांगितले आहे. त्यामुळे पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा विरोधकांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेच्या मनावर बिंबवली असेच चित्र आहे. त्यामुळे पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा लोकांच्या तोंडात बसली आहे, अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळते.