मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. दोन दिवसापूर्वी अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या शरद पवार सोबतच या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीची बैठक -
शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी त्यांची ही सदिच्छा भेट घेतली असल्याचे सांगितले आहे. शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर गेल्या आठवड्यापासून शरद पवार हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. 1 जूनला संध्याकाळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि मंत्री यांची बैठकही बोलावली होती. या बैठकीतून राज्याच्या आढावा त्यांनी घेतला आहे.
हेही वाचा - बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकार लवकरच घेणार निर्णय - वर्षा गायकवाड
सदिच्छा भेट - एकनाथ खडसे
दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. या दहा मिनिटांच्या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस काल (मंगळवारी) जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या निवासस्थानी भेट दिली. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आज शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जातं आहेत. मात्र, शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही घेतलेली सदिच्छा भेट असल्याचं एकनाथ खडसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांना उपचाराची गरज, संजय राऊतांची टीका